नाशिक – नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र आणि आधुनिक भारताचे एक शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड हे ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथालयांचे पोशिंदे होते. सुप्रशासन सामाजिक सुधारणा, न्याय, शेती उद्योग आणि त्यांचे दातृत्व हे देशातील वेगळेपण होते. महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे प्रकाशन केले आहे. बडोदा संमेलनात त्यांच्या बारा ग्रंथांचे प्रकाशन झाले. या वर्षीच्या नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॅा. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत संपन्न झाल्यानंतर ‘प्रकाशन कट्टा’वर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधीच्या पन्नास ग्रंथांचे प्रकाशन बडोदा राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाचे अध्यक्ष, मा. ना. उदयजी सामंत, उच्च व तंत्रशिक्षण आणि अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे हे असतील.
महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनार्ते एका वेळी वीस हजार पृष्ठांच्या पन्नास ग्रंथांचे प्रकाशन प्रथमच होणार आहे. या पन्नास ग्रंथात २६ ग्रंथ मराठीत, १४ ग्रंथ इंग्रजी आणि १० ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीने गेल्या तीन वर्षात २६६४२ पृष्ठांचे ६२ ग्रंथ महाराष्ट्र शासनाने केले आहेत. त्याचबरोबर महाराजा सयाजीराव ट्रस्ट आणि साकेत प्रकाशनाने १०१३० पृष्ठाचे १११ ग्रंथ व ई-बुक केले आहेत. या कामात सदस्य सचिव बाबा भांड, लेखक, संपादक, अनुवादक, मुद्रक आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या मदतीनेच हे काम होऊ शकले. या अक्षरधनात महाराजा सयाजीराव यांचे लेखन, भाषणे, पत्र व्यवहार, जगप्रवास, प्रशासन अहवाल हा या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, सांस्कृतिक वारसा नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होत आहे.