इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतिशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्ञान क्षेत्र जर समृद्ध करायचे असेल तर ज्ञानाप्रती तळमळ, आस पाहिजे. तसा समाज ज्ञानसंपन्न होतो. सीमा प्रदेशात संस्कृतीचे अभिसरण घडत असते. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेह, प्रेम वाढवूया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.
रिद्धपूर येथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावे, त्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद व्हावी, बृहनमहाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे, बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी आदी बारा ठराव यावेळी करण्यात आले.