नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठीला अलिकडेच सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या गौरवाचा आणखी एक भाग म्हणून आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे कौतुक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
हे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. संमेलनात विविध तज्ज्ञमंडळ चर्चा, पुस्तक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिकांसोबत संवाद सत्रांचे आयोजन केले जाईल. हे संमेलन मराठी साहित्याच्या कालातीत प्रासंगिकतेचा उत्सव साजरा करेल आणि समकालीन प्रवाहातील आपल्या भूमिकेचा शोध घेईल. भाषा संवर्धन, भाषांतर आणि साहित्यकृतींवर डिजिटलायझेशनचा प्रभाव या संकल्पनांचा यात समावेश आहे.
देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पुणे ते दिल्ली असा एक प्रतीकात्मक साहित्यिक रेल्वे प्रवासदेखील असून यातून १,२०० सहभागींचे साहित्याविषयी असलेले प्रेम व्यक्त होत आहे. यामध्ये २,६०० हून अधिक काव्य सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० पुस्तकांचे स्टॉल्स असतील. देशभरातील प्रतिष्ठित विद्वान, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी यात सहभागी होतील.