नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो. कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते . साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत“ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही.” इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल .
परंतु याचा अर्थ असा नव्हे की , सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की, इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे .
मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान – साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक – आइन्स्टाइन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्वाचे मूलभूत सिद्धान्त ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली . विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे . जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवीजीवन अधिक प्रगत , विकसित करायला कारणीभूत ठरली .