विशेष प्रतिनिधी, नाशिक
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजपावेतोचा आर्थिक व्यवहाराचा तपशील (जमा-खर्च) संमेलनाच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यापुढेही दर महिन्याच्या ५ तारखेला त्या-त्या महिन्याचा तपशील कार्यालयात लावण्यात येणार आहे. आतापर्यंत (म्हणजे २८ जून) पर्यंतचा हिशेब तपशील देण्यात आला आहे. दरम्यान स्वागत समिती सदस्य श्रीकांत बेणी यांनी या संमेलनाकरिता साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते. एव्हढी मोठी रक्कम कोणकोणत्या बाबींवर खर्च करावी लागणार आहे. हेदेखील निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी जाहीर करावे असे म्हटले आहे.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन स्वागत समितीचे सदस्य श्रीकांत बेणी यांनी दिलेल्या दणक्यानंतर संमेलन आयोजन समितीने आजवरचा जमाखर्च संमेलनाच्या कार्यालयामध्ये लावला ही स्वागतार्ह घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.
.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक साहित्य संमेलनाबाबत ओरखडे ओढल्यानंतर ही बाब राज्यात सर्वत्र चर्चिली गेली होती.