सौ मनिषा साने, पुणे
साहित्य संमेलनासाठी आयोजक असणाऱ्या संस्था तसेच प्रकाशकांचे साहित्य संमेलनाच्या प्रांगणात स्टाँल्स असतात…तिथे त्या त्या संस्थेला आपापल्या उत्पादने वा सेवांची जाहिरात करणे,माहिती देणे यासाठी स्टाँल्स उपलब्ध करून दिले जातात. आमच्या संस्थेला असाच एक स्टाँल मिळाला होता. तिथे आमच्या संस्थेची जाहिरात करणारे मोठे मोठे बँनर लावून स्टाँल छान सजवला होता. आमच्या संस्थेचे एक साहेब होते .साहित्यात रूची असणारे, साहित्यिक आणि कवीमंडळींबद्दल विशेष कौतुक असणारे…. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या स्टाफमधील कवी लोकांचेही ते मनापासून कौतुक करायचे. बाहेरचे कुणी कवी वा साहित्यिक पाहुणे कार्यालयात आले, की अशा स्टाफला बोलावून ओळख करून द्यायचे..अगदी घरात आलेल्या पाहुण्यांपुढे वडीलधारी लहान मुलांना कौतुकाने प्रेझेंट करतात तशीच त्यांची भावना असे.. त्यामुळे थोड्याफार कविता करणाऱ्या , चुणचुणीत बोलता येणाऱ्या मंडळींची वर्णी त्या स्टाँलवर होती त्यात मी आणि एक महाशय होतो.. मी कविता करत असले तरी मूळच्या संकोची स्वभावामुळे दुसऱ्यांपुढे मी मागेच असे.
त्या वर्षीच्या साहित्य संमेलनात काव्यसंमेलन जोरात होते…आयोजक मंडळींची तयारी फारच कमालीची होती.त्या काव्य संमेलनातल्या कवींची संख्या भलतीच दणदणीत होती.. गावगावातून , महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून बरेच कवी सादरीकरण करायला आले होते..आयोजक आणि सादरकर्ते यांच्यात उत्साहाची मोठी जुगलबंदीच होती जणू.. काव्यसंमेलन खूप रंगत गेलं…कवितांना दाद मिळत होती..संयोजक आणि कवींचा जोश उत्तरोत्तर वाढत गेला.. दुपारी सुरू झालेलं ते काव्यसंमेलन संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी कवींची यादी संपेचना.. सर्वांना संधी देणार या नादात घड्याळात कुणीच बघायला तयार नव्हतं..यावर्षी सर्वांना संधी देऊ,रात्रभर चालू ठेवू या नादात संयोजक होतेच.. अखंड काव्ययज्ञ चालू ठेवू असं म्हणणाऱ्या संयोजकांची आता पंचायत झाली.. कारण आपला नंबर आला की कवी कविता सादर करायचे आणि निघून जायचे.परत नवीन कवींची टीम हजर…समोरचे कवी बदलत होते पण संयोजकांना काहीही पर्याय नव्हता..
रेकाँर्ड ब्रेक काव्ययज्ञ त्यांची कसोटी पाहाणाराच होता..बरं आता नाही म्हणून थांबवणे म्हणजे उरलेले कवी नाराज हेही ननको म्हणून ती मंडळी निमूटपणे स्टेजवरून हालली नाही.. आमचा स्टाँल चालू करायला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचलो तेव्हा अजूनही काव्य संमेलन चालू आहे हे कळल्यावर मी त्या सर्व महान संयोजकांना त्यांच्या सहनशक्तीबद्दल मनातल्या मनात नमस्कार केला.. आमचे साहेबही आता स्टाँलवर आले होते..एकदाचे ते रेकाँर्ड ब्रेक काव्यसंमेलन संपले..त्या संयोजक मंडळीची खरंच दमणूक झाली होती..दुपारपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कवितांचा मारा त्यांच्या वर झाला होता.. ती मंडळी परत निघाली..आमच्या स्टाँलवरुन जात असताना आमच्या उत्साही साहेबांनी त्यांना पाहिले.या मोठ्या कवींचा आदरसत्कार आपल्या स्टाँलवर व्हायलाच हवा या इच्छेने त्यांनी त्या कवी संयोजकांना गळ घातली..संस्थेचा नावलौकिक आणि साहेबांचा आग्रह त्यांना मोडवेना. ती मंडळी आली…. बसली…पुष्पगुच्छ देऊन झाले..
त्यांच्या साठी चहा आणायला माणसाला पिटाळण्यात आले.. ती मंडळी चुळबुळत होती कधी एकदा घरी जातोय अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.. आमचे साहेब पुढे सरसावले..”आमच्या संस्थेतही खूप प्रतिभा असलेली मंडळी आहेत बरे”,,ऐकाच तुम्ही त्यांच्या कविता.. असं म्हणत साहेबांनी आम्हाला हाक मारली।माझ्या सहकाऱ्याने त्याची कविता वाचायला सुरूवात केली…नाईलाज होणे म्हणजे काय हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते..त्याची कविता छान होती पण त्या मंडळींची श्रवणशक्ती पूर्ण संपली होती.. साहेबांनी मला पुढे हाक मारली…” नको देवराया, अंत असा पाहू..प्राण हा सर्वथा जाऊ पाहे” अशा नजरेने पाहाणाऱ्या त्या मंडळींना अजून त्रास द्यायचा नाही असं मनोमन ठरवलं आणि खोटंच सांगितले”सर,मी डायरी घरीच विसरले,माझ्या पाठ नाहीत हो कविता”… केवढा चान्स घालवला अशा भावनेने पाहाणाऱ्या सहकाऱ्याकडे मी लक्ष दिले नाही.. साहेबांच्या उत्साहावर पाणी पडलेले दिसत होते पण त्या क्षणी..मला आदरणीय असणाऱ्या त्या संयोजक कवी मंडळींना अजून त्रास द्यायची माझी अजिबात इच्छा नव्हती.. ती मंडळी चहा न घेताच निघाली..पुढच्या वेळी चहा आणि कविता नक्की ऐकणार हे आश्वासन देऊन… या गोष्टीला खूप वर्ष झाली…पण आजही हा प्रसंग आठवला की हसू येतं.. कविता सुनानेके लिये माहौलभी जरूरी है। कविता दुसऱ्यांवर लादू नये हे मी नक्कीच शिकले…
सौ मनिषा साने, पुणे, मोबाईल 9423007361