नाशिक – नाशिकमध्ये होणा-या ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विद्यापीठाकडून निवास व वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाबरोबर साहित्य क्षेत्र महत्वपूर्ण आहे. आरोग्य सेवा करतांना रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद परिणामकारक असतो. आरोग्य क्षेत्रातील लोकांनी साहित्य क्षेत्राशी जुळलेले असले पाहिजे. आपल्याला आवडणारे लेखक, कवी, नाटककार यांना प्रत्यक्ष पहाणे व भेटण्याची संधी संधी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे.
चिंतनशील समाज घडविण्यासाठी साहित्य संमेलन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, नाशिक मध्ये होणारे साहित्य संमेलन ही गौरवाची बाब आहे. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, नाटक व कला क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ताींचा सहवास सर्वांना मिळणार आहे. या अनुषंगाने मा. कुलगुरु यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विद्यापीठाकडून निवास व वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून समन्वकांची नेमणूक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनासंदर्भात माहिती, निवास व वाहनाची अनुषंगिक बाबींसाठी समन्वयकांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र.संचालक संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, भुजबळ नॉलेज सिटी येथील कुसुमाग्रजनगरीत होणा-या मराठी साहित्य संमेलनासाठी निवास व वाहन व्यवस्थेसाठी विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र नाकवे समन्वयक आहेत त्यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक 9922444463 आहे. संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती जाणून घ्यावयाची असल्यास विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 9881734838 वर संपर्क साधावा. सहभागींनी निवास व वाहन व्यवस्थेसाठी समन्वयकांकडे नांव नोंदणी करणे अनिवार्य आहे. वाहने व राहण्याच्या खोल्यांची संख्या मोजकी असल्याने प्रथम नोंदणी करणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोव्हिड-19 संदर्भात शासनाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे असे आवाहन विद्यापीठाकडून सहभागींना करण्यात येत आहे.