नाशिक – मराठी साहित्य संमेलनाची उच्च परंपरा असून नाशिक मध्ये होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनात देखील या परंपरांचे पालन केले जाऊन मराठी साहित्य संमेलन हा राजकीय आखाडा होऊ नये ही अपेक्षा व्यक्त केली. नाशिक ही साहित्यिकांची भूमी आहे. कुसुमाग्रजांना पासून सावरकरांपर्यंत, वसंत कानेटकरांपासून आजच्या लेखकांपर्यंत सर्वांचे योगदान साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे असे असताना मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या शीर्षक गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव टाळण्याच्या झालेल्या प्रकरणाबाबत मत व्यक्त करताना आमदार देवयानी फरांदे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान अद्वितीय होतेच त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोठे होते त्यामुळेच त्यांना २१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले होते तसेच मराठी भाषेत अनेक नवीन शब्द ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी भाषेला देणं आहे.
दिनांक (तारीख), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी),,नेपथ्य, वेशभूषा (कॉश्च्युम),,दिग्दर्शक (डायरेक्टर), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टर्व्हल), उपस्थित (हजर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), पर्यवेक्षक ( सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ ( कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती ( खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊन्टनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर), विधिमंडळ ( असेम्ब्ली), अर्थसंकल्प (बजेट),क्रीडांगण (ग्राउंड), प्राचार्य (प्रिन्सिपॉल), मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल), प्राध्यापक (प्रोफेसर), परीक्षक (एक्झामिनर), शस्त्रसंधी (सिसफायर), टपाल (पोस्ट), तारण (मॉर्गेज), संचलन (परेड), गतिमान, नेतृत्व (लिडरशीप), सेवानिवृत्त (रिटायर), वेतन (पगार) असे अनेक शब्द देऊन मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या साहित्यिकाचे नाव हे शीर्षक गीतांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा सर्वथा चुकीचा असून निषेधार्य आहे. अशा प्रकारे सावरकरांचे नाव शीर्षक गीता पासून वंचित ठेवून त्यांचाच नव्हे तर संपूर्ण मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, नाशिकच्या भूमिपुत्राचा अपमान करून संपूर्ण नाशिककर जनतेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकाराचा मी जाहीर निषेध करत असून आगामी काळात तरी साहित्य संमेलनात वैचारिक आदानप्रदान केली जाईल व साहित्य संमेलनाला राजकीय आखाडा बनवला जाणार नाही अशी अपेक्षा आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली.