नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंच म्हणजे लिहित्या सर्जक महिलांसाठी हक्काचा मंच आहे. अनेक क्षेत्रातील लिहित्या महिला ह्या मंचाच्या सदस्य आहेत. सर्व महिला एकत्रित येऊन आपल्या अभिव्यक्ती,आनंद आणि प्रबोधन ह्यासाठी स्वखर्चाने दरवर्षी हे साहित्यसंमेलन घेत असतात. यंदाही साहित्यसखीचे चौथे एकदिवसीय राज्य महिला साहित्य संमेलन येत्या २५ डिसेंबर २०२२ रविवार रोजी स्त्री मंडळ हॉल, तिडके कॉलनी, नाशिक येथे संपन्न होणार असल्याचे नुकतेच साहित्यसखीच्या अध्यक्ष डॉ.प्रतिभा जाधव व सचिव अलका कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.
सदर राज्य महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.छाया लोखंडे-गिरी(नाशिक) यांची सर्वानुमते निवड झाली असून उद्घाटक म्हणून दिशा शेख(श्रीरामपूर) ह्या उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून आलेल्या कवयित्रींच्या बहारदार काव्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ. सीमा गोसावी(बारामती) ह्या भूषवणार आहेत. तसेच ह्याप्रसंगी अमानवी अत्याचारामुळे ४२ वर्षे कोमात असणाऱ्या व कोमातच मृत्यूस कवटाळणाऱ्या अरुणा शानबाग यांच्या जीवनावर आधारित अंतर्बाह्य हेलावून टाकणारा ‘मी अरुणा बोलतेय!’ हा एकपात्री प्रयोग डॉ. प्रतिभा जाधव सादर करतील.
कवयित्री संमेलनात सहभागी होण्यासाठी तसेच संमेलनात महिला साहित्यिकांना पुस्तकप्रकाशन करायचे असल्यास पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी अलका कुलकर्णी(सचिव,साहित्य्साखी)-९८५०२ ५३३३१ यांचेशी संपर्क साधावा. दि. १० डिसेंबर २०२२ पूर्वी नोंदणीची मुदत असून वेळेवर कुणाचीही नोंदणी घेतली जाणार नाही. नाशिकनगरीत खास महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या ह्या सोहळ्यात जरुर सहभागी व्हा असे आवाहन डॉ.प्रतिभा जाधव व अलका कुलकर्णी यांनी केले आहे.
Sahitya Sakhi Rajya Sammelan Nashik