नवी दिल्ली : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने शनिवारी मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिप पुरस्कारांसाठी 7 साहित्यिकांची तर 24 भाषांतील अनुवाद पुरस्कारांची निवड करण्यात आली.
भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची मानाची फेलोशिप
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. मराठीसह बंगाली, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत आणि तामीळ भाषेतील योगदानासाठी साहित्यिकांनाही मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, कथा संग्रह आणि समिक्षात्मक अशी एकूण 15 पुस्तके प्रकाशित आहेत. श्री. नेमाडे यांनी लंडन स्थित ‘स्कुल ऑफ ओरियंटल अँड आफ्रीकनस्टडीज’ सह विविध विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मराठी आणि तौलानिक साहित्याविषयी अध्यापनकार्य केले आहे. महाराष्ट्रातील लघु मासिकांच्या चळवळीतील अध्वर्युपैकी ते एक आहेत. साहित्यिक योगदानासाठी त्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आदी मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलानिक साहित्यिक अध्यासनाचे प्रमुख म्हणून श्री. नेमाडे निवृत्त झाले. सध्या ते गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागांतर्गत सोहिरोबनाथ अंबिये अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार
प्रसिद्ध मराठी लेखिका सोनाली नवांगुळ यांनी तामीळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या तामीळ भाषेतील कादंबरीचे मराठी अनुवादित ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतातील लेखिका’ या लेखमालेतील 2015 मध्ये प्रकाशित पुस्तक होय. श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. आतापर्यत त्यांनी तीन स्वतंत्र पुस्तक लिहीली असून ‘स्पर्शज्ञान’ या ब्रेल लिपीतील पाक्षिकाच्या त्या संपादन करीत आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. बलवंत जेउरकर, डॉ.प्रतिमा इंगोले आणि डॉ. सूर्यनारायण रणसुभे या साहित्यिकांचा मराठी भाषेतील अुनावादित पुस्तक निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.
मंजुषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी पुरस्कार
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाच्या संस्कृत भाषेतील ‘प्रकाशमार्गा:’ या अनुवादित पुस्तकासाठी लेखिका मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत तसेच त्यांनी नाट्यप्रयोगही केले आहेत. लेखिका जयश्री शानबाग यांच्या ‘स्वप्न सारस्वत’ या कोकणी भाषेतील अनुवादित पुस्तकास कोकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुस्कार जाहीर झाला आहे. गोपालकृष्ण पै यांच्या ‘स्वप्न सारस्वत’ या मूळ कन्नड पुस्तकाचा हा कोकणी अनुवाद आहे. सन्मानचिन्ह, 50 हजार रुपये, ताम्रपत्र असे साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.