इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू , आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयतर्फे १९ वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित इंटर सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
माजी कसोटीपटू व्हिव्हिएस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरूच्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ६ ते १६ मे दरम्यान १९ वर्षांखालील वयोगटासाठी इंटर सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धा बेंगळुरू येथे होत आहे. यातील सी संघात साहिलची निवड झाली आहे. साहिलसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या शुभम कदम व सुश्रुत सावंत यांची देखील सदर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साहिल नुकताच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत २ ते २८ एप्रिल दरम्यान झालेल्या एलिट कॅम्पच्या शिबिरात लागोपाठ तिसऱ्या वर्षी सहभागी झाला होता.
नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकवलेल्या साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती .
साहिलच्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.