नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटातील भारतीय संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठीच्या भारतीय संघात, साहिल पारखची ही निवड बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी आजच घोषित केली आहे.
पुदुचेरी येथे २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवासीय सामन्यांची मालिका होत आहे. भारताचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ इतर देशांशी आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतो. तसेच आयसीसीतर्फे नियमितपणे १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकही आयोजित करण्यात येत असतो.
नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. साहिलच्या रूपाने नाशिकचा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे, नव्या २०२४-२५ हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहेच. साहिल पारख २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता.
त्यापूर्वीच्या हंगामात देखील १६ वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्ही.व्ही. एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख, युवा खेळाडूंसाठी हे शिबीर झाले. साहिल पारेखचे शिबिर नाडियाद येथे पार पडले. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती .
साहिलने मागील २०२३-२४ च्या हंगामात राज्यस्तरीय आमंत्रितांच्या ( सिनियर इन्व्हिटेशन लीग ) टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वरिष्ठ खुल्या गटात खेळताना ३ सामन्यात १८४ च्या स्ट्राइक रेटनी एकूण १६४ धावा फटकावल्या. याच हंगामात इंदोर येथे झालेल्या बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. बीसीसीआयच्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती. बीसीसीआयची सदर १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा ३ ते ९ नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी येथे खेळवण्यात आली. त्याआधी १६ वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी (इन्व्हिटेशन लीग), स्पर्धेतील जोरदार कामगिरी मुळे १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळताना बीसीसीआय विजय मर्चंट ट्रॉफीतही साहिलने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्यात सुरत येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद २२४ धावा फटकावल्या होत्या व नंतर आसाम विरुद्धही अर्धशतक केले होते.
नाशिकचा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहणे हे स्वप्न साकार करायचे आहे
असे मनोगत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद – धनपाल – शहा यांनी वारंवार व्यक्त केले होते. ते साकार होण्याचा क्षण जवळ आला आहे असे म्हणावयास हरकत नाही. गेल्या दोन दशकांपासून चेअरमन विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली , सचिव समीर रकटे व समिती, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडीत आहे. या दरम्यान एन डी सी ए ने, दोनदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संघटनेचा पुरस्कार मिळवला आहे. नाशिकचे अनेक पुरुष व महिला क्रिकेटपटू विविध वयोगटात राज्य व राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेतच.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवासीय सामन्यांत साहिल पारखकडून जोरदार कामगिरीची अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत. साहिलसह १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा किरण चोरमाळे , तसेच राहुल द्रविडचा सुपुत्र समित हे देखील या चमूत निवडले गेले आहेत .
भारतीय संघातील साहिलच्या या अतिशय गौरवपूर्ण व महत्वाच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, तसेच संघातील इतर खेळाडू व संघ प्रशिक्षक या सर्वांनी साहिलचे खास अभिनंदन करून स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.