छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेरुळ येथील मालोजीराजे यांची गढी व शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी सर्व संबंधित विभागांनी सुधारीत प्रस्ताव तयार करुन तातडीने राज्य समितीकडे पाठवावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आज सायंकाळी बैठक पार पडली. पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी तसेच पुरातत्व संचालनालयाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित स्मारकासाठी जागा असली तरी ही स्मारके व मालोजीराजे यांची गढी या जागा दोन वेगळ्या असून त्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसारच प्रस्तावित स्मारकाचा आराखडा तयार करावा. ऐतिहासिक वास्तुंचे जतन व संवर्धन हे पुरातत्व विभागाच्या निर्देशांनुसार करण्यात यावे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा समावेश या आराखड्यात असावा. या सर्व सुधारणांसह लवकरात लवकर हा सुधारीत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.