भोपाळ (मध्य प्रदेश) – येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आपल्या आणखी एका विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना आणखी एक कोलीत हाती लागले आहे. गोमूत्र घेतल्यामुळे फुप्फुसावरील इन्फेक्शन घालविता येते, असे विधान त्यांनी केले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग म्हणतात, ‘मी स्वतः गोमूत्र घेते. त्यामुळेच मला कुठलेही औषध घेण्याची गरज पडत नाही. गोमूत्र घेतल्यामुळेच मला कोरोनासुद्धा झालेला नाही. त्यामुळे देशातील प्रत्येकाने गाय पाळली पाहिजे.’ त्याचवेळी पिंपळ, वड आणि तुळशीचे रोपटे लावल्याने अतिरिक्त ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी भोपाळमध्ये एक कोटी झाडे लावण्याची घोषणाही केली. त्यासाठी लागणारे पाणी टँकरद्वारे पुरविले जाईल, जेणेकरून झाडांची देखभाल नियमित होईल, असेही त्या म्हणाल्या.
‘हा तर गुन्हा आहे‘
काही लोक मला बेपत्ता सांगून माझ्यावर बक्षिसांची घोषणा करीत आहेत. ते लोक संवैधानिक गुन्हा करीत असून त्यांना क्षमा केले जाणार नाही. गुन्हेगारांना दंड ठोठावणे ईश्वराचे काम आहे. मी स्वतः परिस्थिती बघून अस्वस्थ असताना लोकांची मदत करीत आहे. माझे सहकारीदेखील नियमीत काम करीत आहे. आम्ही केवळ आपल्या कामाचा प्रचार केला नाही, त्यामुळे मला बेपत्ता ठरविण्यात आले, अशी व्यथाही त्यांनी मांडली.