इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईमधील दादर माहीम विधानसभा मतदार संघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मतदार संघात पहिल्यांदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना अगोदर उमेदवारी घोषित केली आहे. पण, मनसेने या ठिकाणी अमित ठाकरे यांना पाठींबा द्यावा अशी मागणी महायुतीकडे केली. त्यानंतर येथील राजकारण चांगलेच तापले आहे.
या सर्व चर्चेनंतर आमदार सदा सरवणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून ती सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते.
एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.