सचिनच्या आवाजाची एक वेगळी अशी ओळख आहे. त्याच्या आवाजाचा टोन इतरांपेक्षा वेगळा असल्याने तो लगेच ओळखू येतो. पंरतु या आवाजाचा संबध थेट सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी आहे हे कुणाला माहिती आहे का? कारकिर्दीच्या अगदी सुरूवातीलाच म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सचिनची इंग्लड दौऱ्यासाठी पहिल्यांदाच निवड झाली. तेव्हा, तो रहायचा तिथल्या साहित्य सहवास सोसायटीतील सभासदांनी सचिनसाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता आणि सुनिल गावस्करला या कार्यक्रमाला बोलावले होते.
स्वत: एक विक्रमवीर असल्याने आणि बरेचदा ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी लाभल्याने सुनिल गावस्कर आणि सर डॉन ब्रॅडमन यांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांच्यात बातचित सुध्दा झालेली होती. सहाजिकपणे, सुनिल गावस्करला सर डॉन ब्रॅडमन यांचा आवाज माहिती होता आणि तो सचिन तेंडुलकरच्या आवाजाची मिळताजुळता असल्याचे गावस्करांच्या लक्षात आले होते.
साहित्य सहवास इथल्या कार्यक्रमात बोलतांना सचिनच्या फलंदाजीतली शैली, त्याचे वय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर डॉन ब्रॅडमन यांच्या आवाजाशी मिळता जुळता असलेला त्याचा आवाज हे बघून गावस्करांनी “सचिनने डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडून काढावा, तितकी प्रतिभा त्याच्या फलंदाजीत आहे” असे भाकित केले होते. पुढे सचिनने गावस्करांचा हा आत्मविश्वास खरा करून दाखवला आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडून स्वत: विक्रमादित्य बनला.
विशेष म्हणजे, इंग्लडच्या या दौऱ्यात सचिनने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पहिले शतक झळकावले होते आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा पहिला फलंदाज बनला होता. पर्थ येथे भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघा दरम्यान सुरू असलेल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी दरम्यान समालोचन करतांना रविवारी गावस्करांनी ही आठवण शेअर केली.