इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात गेल्या काही दिवसांपासून ज्या युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्कराला दिले आहेत. त्यामुळे आता युद्ध अटळ झाले असून रशियाच्यावतीने डोबान्स प्रांतामध्ये लष्करी कारवाई सुरू केल्याचे वृत्त विविध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहेत. आमच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची कुठलीही हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्ववभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीने बैठक काल झाली. आज पुन्हा या परिषदेची आपत्कालीन बैठक बोलविण्यात आली आहे. तर, रशियन लष्कराने आक्रमकपणे कारवाई सुरू केल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनची राजधानी कीव येथे स्फोट होत असल्याचे बोलले जात आहे. रशियन अध्यक्ष पुतिन यांनी यापूर्वीच युक्रेन लष्कराला शरणागती पत्करणाची विनंती केली होती. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, असा इशाराही त्यांनी दिला होता. युक्रेनने दाद न दिल्याने अखेर लष्करी कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षा घेता युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आगामी ३० दिवस आणीबाणी लागू असणार आहे. अमेरिकेने यापूर्वीच रशियाच्या या आक्रमक पवित्रा आणि युद्धाच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/AFP/status/1496679924434104324?s=20&t=HBTemYnFC7PLHNF2mwBR8A