विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारताला गेल्या सहा महिन्यांपासून केवळ दोनच लसींवर भागवावे लागत होते. त्यामुळे मधल्या काळात लसीचा तुटवडाही सहन करावा लागला. मात्र आता मूळ रशियाची निर्मिती असलेले स्पुटनिक ५ लस भारतात दाखल झाले आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबने याची निर्मिती केली आहे. हैदराबादमध्ये हे लस लॉन्च करून तेथील नागरिकांना देणेही सुरू झाले आहे. मात्र आता मुंबईसह इतर शहरांमध्येही ते दाखल होणार आहे.
कोविशिल्डचा तुटवडा आणि कोवॅक्सिनच्या प्रभावाबाबत असलेला संभ्रम यामुळे भारतात तसाही लसीकरणाला संथ प्रतिसाद होता. मात्र रशियाने स्पुटनिक लस देण्याचे वचन दिल्यावर भारतीयांच्या जीवात जीव आला.
स्पुटनिक कधी येणार, याची आतुरतेने वाट बघितली जात होती. भारतात डॉ. रेड्डीज लॅबने त्याची निर्मितीही सुरू केली होती. अलीकडेच सर्वांत पहिले हैदराबादमध्ये ते लॉन्च करण्यात आले व येथील नागरिकांचे लसीकरणही सुरू झाले.
आता मुंबई, कोल्हापूर, कोलकाता, चेन्नई, मरियालागुडा, दिल्ली, बंगळुरू यासह आणखी काही शहरांमध्ये स्पुटनिक दाखल होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबने कोविन अॅपवर स्पुटनिकसाठी नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही, अशी माहिती दिली आहे. स्पुटनिक व्यावसायिक रुपात लॉन्च झाल्यावरच ही नोंदणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
हे तापमान हवे
सध्या या लसीचा प्रारंभिक टप्पा आहे. या काळात कंपनी आपल्या कोल्ड स्टोरेजच्या क्षमतेची चाचणी करीत आहे. ही लस मायनस १८ डिग्री तापमानात ठेवावे लागते. त्यामुळे पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. लसीच्या व्यावसायिक लॉन्चिंगनंतर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये ते उपलब्ध असेल, असेही कंपनीचे म्हणणे आहे.