मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाला सुरुवात झाली आहे. जर युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले तर त्याचा परिणाम फक्त रशिया आणि युक्रेनवरपर्यंत मर्यादित राहील असे नाही. युद्धाच्या परिस्थितीत भारतासह जगामध्ये स्मार्टफोन, कार, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमती चांगल्याच उसळलेल्या पाहायला मिळणार आहेत. युद्धामुळे जगभरात चिपसेटचा तुटवडा जाणवणार आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युक्रेनमधून अमेरिकेला ९० टक्के सेमिकंडक्टर ग्रेड नियॉनचा पुरवठा होतो. रशियातून अमेरिकेला ३५ टक्के पॅलेडियमचा पुरवठा केला जातो. हे दोन्ही उत्पादने चिपसेट तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. रशिया जागतिक पातळीवर ४५ टक्के पुरवठा करतो. युक्रेन आणि रशियामधून हा पुरवठा थांबला तर सेंसर आणि मेमरी निर्मितीचे कामे थांबू शकतात. तसेच युक्रेन आणि रशियातून धातूचा पुरवठाही बंद झाल्यास चिपसेट निर्मितीचे काम थांबू शकते. या कारणांमुळे सेमिकंडक्टर निर्मितीच्या व्यवसायाला ब्रेक लागू शकतो. जापानमधील चिप निर्मिती करणाऱ्या कंपनीने सांगितले, की आधीपासूनच या उत्पादनांचा पुरवठा कमी होत होता. आता युद्धाच्या परिस्थितीत पुरवठा पूर्णपणे बंद होऊ शकतो. परिणामी गंभीर संकट निर्माण होऊ शकते. चिपच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
सेमिकंडक्टर म्हणजे काय
सेमिकंडक्टरचा अर्थ अर्धचालक असा आहे. याचा वापर विद्युतप्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सेमिकंडक्टर सिलिकॉनपासून बनवले जातात. ते विजेचे चांगले वाहक असतात. सेमिकंडक्टर मायक्रो सर्किटमध्ये बसवून तयार केले जातात. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सेमिकंडक्टर शिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवले जाऊ शकत नाही. याचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम कॉम्प्युटिंग, वायरलेस नेटवर्किंग, ५जी, ड्रोन, रोबोटिक्स, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये केला जातो.