इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युद्ध कोणताही असो ते मानव समाजासाठी नेहमीच हानीकारक आणि विनाशकारी मानले जाते. सध्या रशियाने यूक्रेनवर आक्रमण केल्याने केल्याने सुमारे १५ दिवसांपासून रशिया – यूक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात यूक्रेनची प्रचंड प्रमाणात हानी झाली असून या युद्धाचे परिणाम आता रशियामध्ये देखील दिसू लागला आहे. रशियन सरकारने आपल्याच देशात खाद्यपदार्थांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. सरकारने सांगितले की रशियामधील किरकोळ विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर मर्यादा घालतील. तसेच, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले होते की, अत्यावश्यक खाद्यपदार्थांची व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मॅकडोनॉल्ड, पेप्सी यासह अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांची सुविधा रशियामध्ये बंद केली आहे. गुगल, फेसबुक, युट्यूब हे सुद्धा बंद करण्यात आले आहे. त्याशिवाय इतरही अनेक सुविधा आणि सेवा ठप्प झाल्याने रशियन मेटाकुटीला आले आहेत. रशियन मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, किरकोळ विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्या व्यापार संघटनांनी एका ठरावाद्वारे किरकोळ विक्रेत्यांना एका वेळी संबंधित व्यक्तींना विकल्या जाणार्या वस्तूंचे प्रमाण मर्यादित ठेवण्याची परवानगी दिली आहे. उद्योग आणि व्यापार मंत्रालय तसेच कृषी मंत्रालयाने व्यापारी संघटनांच्या योग्य पुढाकाराला पाठिंबा दिला आणि त्या धोरणास परवानगी देण्यात आली. यासंदर्भात या संघटना स्वत: धोरण ठरवतील, असेही निवेदनात म्हटले आहे. अत्यावश्यक वस्तूंमध्ये ब्रेड, तांदूळ, मैदा, अंडी आणि निवडक मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आहे, या वस्तूंच्या किमती राज्याच्या नियंत्रणाच्या अधीन आहेत. कारण युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियात आर्थिक संकट येऊ शकते.
युक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर रशियन हल्ल्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेत भर पडली आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध धोरणाचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियन वित्तीय संस्था आणि व्यक्तींना लक्ष्य करत काही आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांमध्ये काही रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी वापरल्या जाणार्या ‘स्विफ्ट’ प्रणालीमधून काढून टाकणे, रशियन कंपन्या आणि पाश्चात्य देशांमधील उद्योगपतींची मालमत्ता गोठवणे आणि रशियाच्या केंद्रीय बँकेला 630 अब्ज डॉलर्सपर्यंत परकीय चलन साठा वापरण्याची परवानगी देणे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे युक्रेनची राजधानी कीवमध्ये युद्धाच्या काळात देशाच्या सैन्यात सामील होण्यासाठी शेकडो पुरुष रांगेत उभे आहेत. युक्रेनच्या सरकारने लष्करी कामासाठी त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे, वेलोदिमीर ओनिस्कोसारखे काही तरुण स्वतः युद्धासाठी तयार आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही इथे का आलो आहोत हे आम्हाला चांगले माहीत आहे. आपण आपल्या देशाचे रक्षण का करत आहोत हे देखील आपल्याला माहीत आहे. आमची माणसे तिथे उभे आहेत आणि रशियन सैनिकांशी लढत आहेत.