इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मॉस्को – रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर स्पष्टीकरण देताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भाषण काही काळासाठी बाधित झाले होते. या भाषणाचे प्रसारण रशियाच्या राष्ट्रीय टीव्ही वाहिनीच्या माध्यमातून केले जात होते. तांत्रिक कारणामुळे प्रसारण थांबविले होते, असे नंतर सांगण्यात आले.
मॉस्कोच्या लुजनिकी स्टेडिअममध्ये बोलताना पुतिन यांनी आपल्या हजारो नागरिकांना आश्वासन दिले, की क्रेमलिनशी संबंधित सर्व लक्ष्य काही दिवसांतच प्राप्त करणार आहोत. त्यांच्या भाषणादरम्यान रशियाचे झेंडे फडकत होते आणि घोषणाबाजीही होत होती.
पुतिन म्हणाले, की काय करायचे आहे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. यासाठी काय किंमत चुकवावी लागू शकते, हेसुद्धा आम्हाला ठाऊक आहे. आमचा पुढील नियोजनही तयार आहे. स्टेडिअममध्ये उपस्थित पुतिन यांचे समर्थक घोषणाबाजी करत होते. त्यांच्या समर्थनार्थ झेंडे घेऊन पोहोचले होते. अनेक झेंड्यांवर Z असे निशाण होते.
युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या रशियाच्या सैनिकांच्या तुकड्या Z निशाणाच्या झेंड्यांचा वापर करत आहे. त्याशिवाय अनेक नागरिक Za Putin असे फलके घेऊनही पोहोचले होते. रशियन भाषेत याचा अर्थ पुतिनसाठी असा होतो. आज आमचे नागरिक खांद्याला खांदा देऊन उभे आहेत. ते एकमेकांची मदत करत आहेत. अशी एकता दीर्घकाळानंतर पाहायला मिळाली आहे, असे पुतिन आपल्या भाषणात म्हणाले.