इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा परिणाम जगभर दिसून येत आहे. भारतही याला अपवाद नाही. पेट्रोल आणि डिझेलचे भाव आधीच गगनाला भिडत असतानाच आता शेतीसाठी लागणाऱ्या खतांबाबतही महागाईची परिस्थिती ओढावली आहे.
रशिया – युक्रेन युद्धाचा देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे भारताच्या खत अनुदानाचा बोजा चालू आर्थिक वर्षात २ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २०२२ – २३च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताच्या खत अनुदानाचा खर्च अंदाज सुमारे १ लाख कोटी रुपये होता. परंतु तो त्यापेक्षा एक लाख कोटी रुपये अधिक आहे. म्हणजेच अंदाजानुसार लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा भारतावर पडणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ३१ मार्च रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षातील सुधारित अंदाजानुसार खत अनुदान १.४ लाख कोटी रुपये होते. रशिया – युक्रेन संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत चालू वर्षाचा बोजा ६० हजार कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे.
युक्रेन युद्ध आणि इराणवरील निर्बंधांमुळे डीएपी आणि युरियासाठी लागणाऱ्या विविध सामग्रीवर संकट निर्माण झाले आहे. युद्ध आणि निर्बंधांमुळे पुरवठा साखळीतील अडथळे निर्माण झाले आहेत. त्येमुळे ते दुर्मिळ झाले आणि आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या आहेत. भारत आपल्या कृषी क्षेत्रासाठी या खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो.
अहवालात म्हटले आहे की, युक्रेनवरील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय गॅसच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. युरियाच्या निर्मितीमध्ये गॅसचा वापर हा एक प्रमुख घटक आहे. म्हणजेच सुमारे ७० टक्के खर्च गॅसवर होतो. “खते बनवण्यासाठी गॅस हा एक मुख्य घटक आहे. इराणवरील निर्बंधांमुळे आमची पुरवठा साखळी आधीच विस्कळीत झाली होती आणि त्याशिवाय, रशिया – युक्रेन युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे,” असे अधिकारी म्हणाले.
तथापि, रसायन आणि खते मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, सरकारने वर्षभराची गरज भागवण्यासाठी ३ दशलक्ष टन डीएपी आणि ७ दशलक्ष टन युरिया खरेदी केला आहे. त्याचबरोबर, भारताने देशभरात अनेक उत्पादन युनिट्सची स्थापना केली आहे आणि काही वर्षांत भारत देशांतर्गत सर्व मागणी पूर्ण करण्यासाठी खतामध्ये भारत स्वयंपूर्ण होईल. देशात खतांचा तुटवडा असल्याची विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली चिंता त्यांनी अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. “हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या दुकानांवर रांगा लागणे सामान्य आहे कारण प्रत्येकजण एकाच वेळी खरेदी करण्यासाठी पोहोचतो. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. देशात पुरेसा साठा आणि पुरवठा आहे.”