इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेनमधील युध्दात युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ड्रोनचा हल्ला केला आहे. हा हल्ला रात्री करण्यात आला. या हल्यात दोन सरकारी इमारतींच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. हा हल्ला झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रशियाने नुकावो एअरपोर्ट बंद केले आहे.
दोन दिवसांपूर्वी युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रशियन सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला होता. यावेळी रशियन सैन्याने मानवरहित विमान नष्ट केले होते. पण, आता युक्रेनने ड्रोनने रशियात घुसून हा हल्ला केला. या युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियन लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देत अनेक ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरला झाला आहे. त्यात एक महिला अपार्टमेंटमध्ये झोपलेली दिसत आहे. त्यावेळी अचानक एक ड्रोन इमारतीला येऊन धडक देतो. हा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय असतानाच हा हल्ला झाला. रशियाच्या या एअर डिफेन्स सिस्टिमलाही हा हल्ला टाळता आला नाही.