इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाटोच्या सैन्याने युक्रेनची मदत न केल्यामुळे रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेले युद्ध दीर्घकाळ चालणार नसल्याचे चित्र आहे. येत्या एक-दोन दिवसाच्या आतच रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशियाचे सैन्य राजधानी किव्हमध्ये घुसले आहे. रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनच्या सैन्याकडून पूल तोडले जात असल्याने ते दीर्घकाळ लढू शकणार नाही अशीच स्थिती आहे.
संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे की, ही युक्रेनची रणनितीक चूक आहे. ते अमेरिका आणि नाटो सदस्य देशांच्या जाळ्यात फसले. आजच्या परिस्थितीत एखादा देश स्वतः सक्षम असेल किंवा त्याला कोणत्यातरी देशाची मदत मिळत असेल तेव्हाच तो युद्ध करू शकेल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनला मदत करणार असल्याचे सांगत राहिले. परंतु युक्रेनच्या मदतीसाठी सैनिक पाठवण्याबाबत कोणीही वक्तव्य केले नाही. या तथ्यावर युक्रेनने विचार करायला हवा होता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांच्या आत रशिया युक्रेनवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. त्यानंतर युद्ध समाप्त होणे आवश्यक आहे. परंतु रशियाचा हेतू काय आहे हेसुद्धा पाहावे लागणार आहे. रशियाला आपल्या मर्जीतील सरकार युक्रेनमध्ये स्थापित करायचे आहे का? की युक्रेनला रशियामध्ये विलीन करून घ्यायचे आहे? रशिया युक्रेनमधील सध्याचे सरकार उलथवून समर्थित सरकार स्थापन करण्याचीच शक्यता जास्त आहे.
सामरिकशास्त्र तज्ज्ञ सांगतात की. युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्यावरून रशिया चिंतीत झाला होता. कारण पूर्व युरोपमधील ११ देशांना नाटोमध्ये सहभागी करून घेण्यास अमेरिकेला यश आले आहे. युक्रेन जर नाटोमध्ये सहभागी झाले असते, तर रशियासाठी मोठे आव्हान आणि धोका निर्माण झाला असता. चीन भारताच्या डोकलाममध्ये घुसल्यानंतर भारताला जसा मोठा धोका निर्माण झाला होता, तसेच या घटनेला पाहायला हवे. रशियाच्या सैनिकांनी चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रावर ताबा मिळवणे ही सामान्य घटना आहे. रशियाच्या मार्गावरच हे केंद्र आहे. या केंद्रात अणू कचरा पडून आहे. हा कचरा प्रक्रिया करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे रशियाच्या सैन्याने या केंद्रावर ताबा मिळवला आहे. येथे बॉम्ब हल्ला केला असता तर रेडियशनचे उत्सर्जन होण्याचा धोका होता.