इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युद्धग्रस्त युक्रेनमध्ये फसलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांपर्यंत भारतातून विमाने पाठवली जात आहेत. या बचावकार्यादरम्यान पाळीव प्राणी आणण्याची आता स्पर्धाच सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कीर्तना अखेर शनिवारी आपल्या पाळीव कुत्रा कँडी याच्यासोबत चेन्नई येथे पोहोचली आहे. भारताकडे प्रयाण करण्यापूर्वी कीर्तना पाळीव प्राण्याला सोबत घेऊन जाण्यासाठी अडून बसली होती. आपल्या पाळीव कुत्र्यासाठी तिने चार विमाने सोडून दिले होते. अखेर भारतीय दूतावासाने पेकिंगीज जातीचा कुत्रा सोबत घेऊन जाण्यास परवानगी दिली.
केंद्र सरकारने युक्रेनमध्ये फसलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा या अभियानांतर्गत विशेष विमानांची सेवा सुरू केली आहे. शनिवारी कीर्तना कँडी नावाच्या आपल्या पाळीव कुत्र्यासोबत चेन्नई विमानतळावर पोहोचली. स्वागतासाठी तिचे कुटुंबीय उपस्थित होते. मला चार वेळा आपली उड्डाणे रद्द करावी लागली. कारण मला आधी पाळीव प्राण्याला परत आणण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मी अतिरिक्त दोन-तीन दिवस वाट पाहिली. अखेर दूतावासाकडून मला फोन आला आणि त्यांनी मला पाळीव प्राण्याला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली, अशी माहिती कीर्तनाने एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
तथापि, दोन वर्षांच्या पेकिंगीज जातीच्या कुत्र्याच्या पिल्लाला परत आणण्यासाठी कीर्तनाने आपले सामान तिथेच सोडून दिले. ती म्हणाली, अधिकाऱ्यांनी मला सांगितले की ती पिल्लाला घेऊन जाऊ शकते, परंतु तिला तिचे सामान सोडावे लागेल. ती यासाठी तयार झाली. तिच्यासाठी पाळीव प्राणी खूप महत्त्वाचा आहे, असे तिने सांगितले. कीर्तना तामिळनाडूमधील मईलादुथुरई येथील रहिवासी आहे. ती युक्रेनमधील उझहोरोड राष्ट्रीय विद्यापीठात शिकत होती. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत १३,३०० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणे आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर बहुतांश भारतीय नागरिकांनी सोडले आहे. सुमी शहरातून भारतीय नागरिकांना काढण्याचे सरकारचे प्रमुख्य लक्ष्य असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.