इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर केलेल्या सैन्य कारवाईत पहिल्याच दिवशी मोठा विध्वंस घडवून आणला आहे. रशियाच्या सैनिकांनी गुरुवारी चेर्नोबिल अणुऊर्जा संयंत्रावर ताबा मिळवला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांचे सल्लागार मायहेलो पोडोयक यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोडोयक म्हणाले, की युक्रेनने चेर्नोबिलवरील नियंत्रण गमावले आहे. आमचे सैनिक रशियाच्या सैनिकांशी भीषण युद्ध लढले. रशियाच्या या मूर्ख हल्ल्यानंतर चेर्नोबिल येथील संयंत्र सुरक्षित राहिले नाहीत. ते म्हणाले, की पहिल्या दिवशी झालेल्या युद्धात एकूण १३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रों यांनी शुक्रवारी युक्रेनला सैनिकी उपकरणे आणि ३३ कोटी डॉलरची आर्थिक मदत देऊ केली. एका विशेष युरोपीयन शिखर संमेलनानंतर मॅक्रों म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी पूर्वी माझी खूप कमी काळासाठी चर्चा झाली होती. नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनी लवकर युद्ध समाप्त करण्याचे आवाहन करण्याच्या तसेच जेलेंस्की यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रस्तावावर पुतिन यांच्याशी चर्चा करायची होती, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटोमधील सहकारी असलेल्या जर्मनीमध्ये अतिरिक्त ७ हजार सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता दिल्यानंतर पुतिन यांच्या आदेशावरून रशियन सैनिकांनी हल्ले वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर बायडेन यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी गुरुवारी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या दूरध्वनीवरून चर्चा केली. रशियाने युक्रेनवर केलेल्या सैन्य कारवाईचा निषेध करण्यास नकार दिला. परंतु सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगण्याचे तसेच तणाव अनियंत्रित होऊ नये याचे आवाहन केले.
मोदी-पुतीन चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा केली. रशियाने युक्रेनवरील हल्ला त्वरित थांबवून हिंसाचार रोखावा. तसेच दोन्ही पक्षांनी चर्चेच्या मार्गावर परतून ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पुतीन यांनी या वेळी पंतप्रधानांना युक्रेनशी संबंधित झालेला घटनाक्रम उलगडून सांगितला. रशिया आणि नाटो समुहादरम्यान असलेले मतभेद फक्त प्रामाणिकपणा आणि चर्चेच्या मार्गाने सोडवले जाऊ शकतात असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. युक्रेनमधील भारतीय नागरिक विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेची रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जाणीव करून दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना स्वदेशात आणण्यास भारत प्राधान्य देतो असेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशांचे अधिकारी आणि मुत्सद्दी दल सामायिक हितांच्या मुद्द्यांवर नियमित संपर्कात राहणार असल्याचे मोदी आणि पुतीन यांनी सहमती व्यक्त केली.