इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया- युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता चारही बाजूने दिसून येत आहेत. या युद्धामुळे युरोप, अफ्रिका आणि आशियातील नागरिकांसाठी अन्नधान्याचा पुरवठा आणि उपजीविका या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे. युक्रेनच्या शेजारील काळ्या समुद्राचा प्रदेश सुपीक शेतीवर अवलंबून आहे. परंतु युद्धामुळे हजारो शेतकऱ्यांना पलायन करावे लागत असल्याने उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सध्याच्या परिस्थितीत बंदराना बंद करण्यात आले आहे. हे बंदर अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे केंद्र मानले जात होते. येथून जगभरात रोटी नूडल्स आणि पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारे गहू आणि इतर खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जात होता. तथापि, गव्हाच्या पुरवठ्यात सध्या अडथळा आला नसला तरी पुढील काळात अडथळा येऊ शकतो. याच अनिश्चिततेमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा फायदा रशियाला होण्याची शक्यता आहे. रशिया आता खाद्यपदार्थांची निर्यात वाढवू शकतो. आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचे संचालक अरनौद पेटिट यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले, की हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले, तर युक्रेनमधून स्वस्त गव्हाची आयात करणाऱ्या देशांमध्ये जुलै महिन्यात खाद्यपदार्थांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या संकटामुळे इजिप्त आणि लेबनानसारख्या देशांमधील नागरिक गरिबीच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये सरकारकडून अन्नपदार्थांवर अनुदान दिले जाते.
युरोपमध्ये युक्रेनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांच्या किमतीवरून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. युरोपमध्ये पशुखाद्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मांस आणि डेअरीची उत्पादने महाग होऊ शकतात. रशिया आणि युक्रेन जगाच्या जवळपास एक तृतीयांश भागात गहू आणि जवाची निर्यात करतात. युक्रेन हा मक्याचा प्रमुख पुरवठादार देश आहे. इतकेच नव्हे, युक्रेनमध्ये सूर्यफुलाच्या तेलाचे सर्वाधिक उत्पादन होते. युद्धामुळे युक्रेन आणि रशियावरच नव्हे तर संपूर्ण जगावर त्याचे परिणाम होणार आहेत. युक्रेन युद्ध संकटाचा परिणाम भारतावरही होणार आहे. यामुळे भारताच्या आर्थिक विकासावर परिणाम होणार असून, सामान्य माणसाच्या खिशाला झळ बसणार आहे. भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जयंत आर वर्मा यांनी सांगितले.