मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशियन-युक्रेन युद्धाचा जागतिक वित्तीय बाजारांवर परिणाम झाल्यामुळे, सरकार LIC चा मेगा IPO पुढे ढकलू शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की, विमा कंपनीतील आपल्या स्टेकचे जास्तीत जास्त मूल्य मिळविण्यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पाहू शकते. एका सरकारी सूत्राने सांगितले की, “आता युद्ध सुरू आहे त्यामुळे आम्हाला LIC IPO पुढे जाण्यासाठी परिस्थिती समजून घ्यावी लागेल. सरकार LIC IPO पुढील आर्थिक वर्षापर्यंत पुढे ढकलू शकते. या महिन्यात आयपीओ बाजारात येण्याची अपेक्षा होती.”
रशिया-युक्रेन युद्ध बुधवारी सातव्या दिवशीही सुरूच राहिले. युक्रेनची राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरांमध्ये लढाई आता अजूनच तीव्र झाली आहे. चालू आर्थिक वर्षात ७८ हजार कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जीवन विमा कंपनीतील ५ टक्के हिस्सा विकून ६३ हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची अपेक्षा होती. IPO पुढील आर्थिक वर्षासाठी पुढे ढकलल्यास, सरकार सुधारित निर्गुंतवणुकीचे लक्ष्य मोठ्या फरकाने चुकवेल. या आर्थिक वर्षात आतापर्यंत, सरकारने CPSEs च्या निर्गुंतवणुकीतून आणि एअर इंडियाच्या धोरणात्मक विक्रीद्वारे १२ हजार ३० कोटी रुपये उभे केले आहेत. सरकारने यापूर्वी २०२१ – २२मध्ये निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख रुपये उभारण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
LIC मध्ये सरकारचे १०० टक्के स्टेक किंवा ६३२.४९ कोटीपेक्षा जास्त शेअर्स आहेत. शेअर्सचे दर्शनी मूल्य १० रुपये प्रति शेअर आहे. LIC पब्लिक इश्यू हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असेल. एकदा सूचीबद्ध झाल्यानंतर, LIC चे बाजार मूल्य RIL आणि TCS सारख्या कंपन्यांच्या बरोबरीचे असेल. आतापर्यंत, २०२१मध्ये पेटीएमच्या IPO मधून उभारलेली रक्कम सर्वात मोठी १८ हजार ३०० कोटी रुपये होती, त्यानंतर कोल इंडिया (2010) सुमारे १५ हजार ५०० कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवर (२००८) ११ हजार ७०० कोटी रुपये होती.