इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियन सैन्याने युक्रेनवर चढाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर या संकटाचा भारतावर काय परिणाम होईल याची सर्वांना चिंता लागून आहे. मात्र या युद्धामुळे आपल्या देशाचे आर्थिक आव्हान वाढू शकते. भारताच्या आर्थिक आढाव्यात अर्थव्यवस्थेसाठी केलेले मूल्यांकन कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल 70 ते 75 डॉलरच्या अंदाजे किंमतीपर्यंत केले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्यावर गेले आहे.
यावर्षी 14 जानेवारी रोजी कच्च्या तेलाची किंमत विक्रमी 96.98 प्रति बॅरलवर पोहोचली होती, सप्टेंबर 2014 नंतरचा उच्चांकी दर ठरला आहे. रशिया-युक्रेनचे संकट आणखी वाढले तर ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि ग्राहकांसाठीही अडचणीचे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. जागतिक तेल उत्पादनात रशियाचा सध्याचा आणि अंदाजे वाटा 13 टक्के आहे. त्यातच भारत आपले सर्वाधिक परकीय चलन हे महाग कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करतो. कच्च्या तेलाच्या महागाईमुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल-डिझेल, विमान इंधन आणि एलपीजीच्या किमतीत वाढ करावी लागत आहे. यामुळे एकीकडे तुम्हाला खासगी वाहन वापरणे अधिक महागात पडते. त्याचवेळी भाडे वाढल्याने सार्वजनिक वाहतूक देखील महागात पडते.
याशिवाय मालवाहतुकीच्या किमतीमुळे खाद्यपदार्थांसह सर्व उत्पादनांच्या किमती वाढतात, त्याचा बोजा ग्राहकांवर पडतो. युरोपचा पुरवठा कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होईल. युरोपच्या एकूण तेल आणि वायूच्या वापरापैकी 40 टक्के रशिया पूर्ण करतो. युक्रेनचे संकट वाढल्यास रशिया युरोपला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा खंडित करू शकतो. युरोपीय देशांना इतर उत्पादकांकडून खरेदी करावी लागू शकते. मात्र हे एका रात्रीत करणे शक्य नाही. अशा स्थितीत मागणीत वाढ आणि पुरवठा कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत अनपेक्षितपणे उडी येऊ शकते. जागतिक स्तरावर कच्चे तेल महाग झाल्यास त्याचा परिणाम भारतातील ग्राहकांवरही होईल.
संरक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. भारताच्या संरक्षण आयातीत रशियाचा 49 टक्के हिस्सा आहे. तर रशियाच्या संरक्षण आयातीत भारताचा 23 टक्के वाटा आहे. तसेच जागतिक संरक्षण निर्यातीत रशियाचा वाटा 20 टक्के आहे, तर एकूण जागतिक संरक्षण आयातीत भारताचा वाटा 9.5 टक्के आहे. संरक्षण क्षेत्राशिवाय भारत आणि रशियामध्ये फारसा द्विपक्षीय व्यापार नाही. भारताच्या एकूण आयातीत रशियाचा वाटा केवळ 1.4 टक्के आहे. त्याचवेळी भारताच्या एकूण निर्यातीत रशियाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 0.90 टक्के आहे. अशा परिस्थितीत रशिया-युक्रेन संकट वाढले तर भारत-रशिया आयात-निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही.