नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे जगावर परिणाम दिसून येत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठलेला असताना आता खाद्यतेलांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनकडून भारत सूर्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो. या पार्श्वभूमीवर आगामी दोन महिन्यापर्यंत सूर्यतेल आणि इतर खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन खाद्यतेल उद्योग क्षेत्राने सरकारला दिले आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सूर्यतेलासह इतर खाद्यतेलाचा पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या दोन दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याबद्दलही उद्योजकांनी मंत्रालयाला या वेळी माहिती दिली.
बैठकीदरम्यान गोयल म्हणाले, की सूर्यतेलाचा पुरेसा साठा असून त्याची अजिबात कमतरता नाही. मार्च महिन्याच्या डिलिव्हरीसाठी १.५ लाख टन सूर्यतेलाची पहिली खेप युद्धापूर्वी युक्रेनवरून पाठविण्यात आली होती. ही खेप लवकरच भारतात पोहोचेल अशी आशा आहे. सूर्यतेलाला पर्याय म्हणून देशात मोहरी आणि सोयाबीन तेल उपलब्ध आहे. त्यामुळे चिंतीत होण्याची गरज नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, खाद्यतेलांच्या किमती गेल्या दोन दिवसात कमी झाल्या आहेत. खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत करण्यासह त्याच्या किमती स्थिर ठेवण्याबाबत उद्योग मंत्रालयाने आश्वासन दिले आहे. देशात ११ लाख टन मोहरीचे नवे पीक आल्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात तेलाचा चांगला पुरवठा होईल. भारतात एका महिन्यात १८ लाख टन खाद्यतेलाचा खप आहे. यामध्ये १.५ ते २.० लाख टन सूर्यतेलाचा खप होतो. सूर्यतेल घेणाऱ्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी जवळपास एक लाख टन सूर्यतेलाची आवश्यकता आहे. देशात ६० टक्क्यांहून अधिक खाद्यतेल आयात होते. जागतिक घडामोडींमुळे देशांतर्गत खाद्यतेलांच्या किमतींवर दबाव कायम आहे.