इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशिया सज्ज झाला असून, हल्ल्याची उलट गणना सुरू झाली आहे. कारण १६ फेब्रुवारी म्हणजेच आज रोजी रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांनी दिला होता. आजच युक्रेन एकता दिवस म्हणून साजरा करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. रशिया पहाटे तीन वाजेपर्यंत युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकी संरक्षण विभागाच्या सूत्रांनी केला आहे. काही वृत्तांनुसार, रशियाचे लष्कर व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर अनेक ठिकाणी युक्रेनवर हल्ला करू शकते. भारतीय वेळेनुसार युद्धाची घोषणा रात्री साडेबारा वाजता होऊ शकते. मध्यरात्री अडीच वाजता युक्रेनच्या अनेक भागांवर हल्ला सुरू होऊ शकतो.
दरम्यान, या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुतिन मंगळवारी म्हणाले, की रशिया आत्मविश्वास वाढवण्याच्या उपायांवर अमेरिका, नाटोसोबत चर्चेसाठी तयार आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, की आम्ही हल्ला करू इच्छित नाही. त्यामुळे आम्ही चर्चेचा मार्ग सुचवला आहे. यामध्ये आमच्या देशासह सर्वांच्या सुरक्षेच्या हमीचा समावेश आहे. क्षेपणास्त्र तैनातीची मर्यादा आणि सैनिक पारदर्शतेवर अमेरिका आणि नाटोसोबत चर्चा करण्यास रशिया तयार आहे. युक्रेनवर हल्ला करणार नसल्याचे रशियाने म्हटले असले तरी संपूर्ण जगाचे युक्रेनच्या सीमेवर लक्ष आहे. पुतिन यांच्यावर विश्वास नसल्याने ते कधीही हल्ला करू शकतात, अशी भीती युक्रेनपासून अमेरिका आणि नाटोच्या सदस्य देशांना वाटत आहे. एका अहवालात असा दावा केला आहे की, रशिया आधी युक्रेनची राजधानी कीव येथे हल्ला करणार आहे. या युद्धाची सुरुवात जमिनीवरून होईल. त्यानंतर रशियाचे सैनिक कीवमध्ये घुसून युक्रेनच्या सैनिकांवर जोरदार प्रहार करतील. यादरम्यान लढावू विमाने आणि हेलिकॉप्टर अलर्ट राहतील.
https://twitter.com/AFP/status/1493879577030139916?s=20&t=5Cyq0Tzcts7ePFS17lJEwQ
या युद्धात रशिया भयानक विद्ध्वंस करेल हे जगजाहीर आहे. या रक्तपातात ५० हजार सामान्य नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ हजारांहून अधिक युक्रेनचे सैनिक मारले जाऊ शकतात. तसेच ४ हजार रशियाचे सैनिकही मारले जाऊ शकतात. त्याशिवाय नागरिकांचे स्थलांतराचीसुद्धा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने युक्रेनवर हल्ला केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा रशियाला दिला आहे. या मुद्द्यावर कूटनीतिक उपाय काढण्यावर भर दिला आहे. ब्रिटेननेसुद्धा रशियाच्या कंपन्यांवर प्रतिबंध घालण्याची धमकी दिली आहे. कोणत्याही वादाच्या परिस्थिती पाश्चिमात्य देशांनी एकजूट ठेवावी लागणार आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर चीनने त्याची निंदा करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनकडे केली आहे.