मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रशिया आणि युक्रेनदरम्यान जवळपास २४ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस घडवून आणला आहे. पण हे युद्ध पाहताना दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण आपल्याला लक्षात येईल. या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये शस्त्रास्त्र विक्री करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. ही शस्त्र विक्री करून अमेरिका आपला नफा पाहत असल्याचे बोलले जात आहे.
निवृत्त लेफ्टिनंट जनरल राकेश शर्मा एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अमेरिका आपला फायदा शोधत आहे. दोन्ही देशांमधील युद्ध सुरू राहावे आणि त्याचा लाभ अमेरिकेला मिळत राहावा, असे त्यांना वाटते.
शर्मा सांगतात, की हे युद्ध अमेरिकेसाठी फायदेशीर ठरले आहे. पोलंडने अचानक ६ कोटी डॉलरचा रणगाडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकी शस्त्रास्त्र उद्योगाची चलती सुरू झाली आहे. युद्ध सुरू राहावे हेच त्यांना वाटते. ते दोन्ही हाताने पैसे गोळा करत आहेत. या युद्धाची कोणतीच सीमा नाही, ते फक्त राजनैतिक चर्चा करून बंद केले जाऊ शकते.
शर्मा सांगतात, की रशियाच्या सैनिकांचे हात मागून बांधण्यात आले आहेत. लिबिया, अफगाणिस्तान आणि इतर ठिकाणी शहरेच्या शहरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. परंतु युक्रेनमध्ये असे दिसून येत नाही. कारण युक्रेनचे नागरिक माझे नागरिक आहेत आणि माझे नागरिक युक्रेनचे नागरिक आहेत, असे व्लादिमीर पुतिन सांगत आहेत. त्यामुळे रशियन फौजांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. राजनैतिक चर्चेद्वारेच युद्ध समाप्त होऊ शकते.
सामरिक तज्ज्ञ सुशांत सरिन सांगतात, या युद्धाचे विपरित परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहेत. पुतिन जसा विचार करत होते, त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने युक्रेन रशियाचा सामना करत आहे. युक्रेन रशियासमोर अशा पद्धतीने टिकून उभा राहू शकतो याचा अंदाज पुतिन यांना लावता आला नाही.