इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्ध थांबवून सामोपचाराने प्रश्न सोडविण्यासाठी बेलारूसमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी शांतता चर्चेची पहिली फेरी झाली. परंतु तब्बल सहा तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली. परंतु एकीकडे चर्चा सुरू असताना रशियाने युक्रेनची राजधानी किव्हमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरूच ठेवले होते. युद्ध पूर्णपणे थांबणे आवश्यक असून, रशियाच्या फौजांनी माघारी परतावे, अशी मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयातर्फे चर्चा सुरू होण्यापूर्वी करण्यात आली होती. दरम्यान, या युद्धात बॉम्बस्फोट आणि गोळीबारामुळे १६ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
युक्रेनने केलेली मागणी रशिया मान्य करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. कारण या चर्चेचे यश काही अटींवर निश्चित असेल, असे रशियाने आधीच स्पष्ट केले होते. रशियाच्या अटींनुसार, युक्रेन एक तटस्थ राज्य राहील असे त्याने स्वतः घोषित करावे. युक्रेनला क्रिमिया, लुहांस्क आणि डोनेत्सक या राज्यांप्रमाणे रशियाच्या अधिकारक्षेत्रात राहावे लागेल. युक्रेन आणि त्याचे इतर साथीदार नाटोचे सदस्य होणार नाहीत. त्यामुळे ही चर्चा किती यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे. रशियाच्या परराष्ट्र धोरणांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात की, या चर्चेमध्ये रशियाचे पारडे जड राहणार आहे. रशिया युक्रेनला एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यास मान्यता देणार नाही, हीसुद्धा शक्यता आहे. युक्रेन नाटोचा सदस्य होणार नाही, ही रशियाची अट मान्य केली, तर रशिया आपले सैनिक माघारी बोलवू शकतो.
भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा म्हणाले की, त्यांच्या देशाची परिस्थिती खूपच गंभीर आणि नाजूक आहे. हे युद्ध थांबले नाही तर युक्रेनच्या निर्वासितांची संख्या ४ लाखांवरून ७० लाखांपर्यंत पोहोचेल. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची युक्रेनच्या सीमेवर मोठी रांग लागली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच रशियाने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवले आहे. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. युद्धाच्या कालच्या पाचव्या दिवशीही रशियाला किव्हचा ताबा घेता आला नाही. युक्रेनकडून तितकाच जोरदार प्रतिकार पाहायला मिळत आहे. रशियाच्या मुख्य फौजांनी आता किव्हचा ताबा घेण्यासाठी वेढा आणखी घट्ट केला आहे. काही ठिकाणी युक्रेनच्या नागरिकांनी रशियन फौजांना माघार घ्यायला लावली.