इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अद्याप रशिया – युक्रेन युद्ध सुरूच आहे, या युद्धाचे जगभरात पडसाद उमटत असून त्याचे सर्वाधिक तीव्र परिणाम युक्रेनवर होत आहेत, परंतु युक्रेन मध्ये अडकलेल्या अन्य देशातील नागरिकांना देखील याचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात युद्धाशी संबंधित परिणामाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत, नागरिकांचे जगण्यासाठीचे तीव्र संघर्ष देखील दिसून येत आहेत, त्यापैकीच नुकतीच एक घटना समोर आली आहे, ती म्हणजे एका लहान चिमुरड्याची होय. त्याच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या काळात एका 11 वर्षांच्या युक्रेनच्या एका मुलाने अप्रतिम धैर्य दाखवले असून सुमारे 1000 किमीचा प्रवास करून तो एकटाच स्लोव्हाकियाला पोहोचला. यावेळी त्याच्याकडे फक्त बॅकपॅक, त्याच्या आईची चिठ्ठी आणि दूरध्वनी क्रमांक होता. आश्रयाच्या शोधात इतर देशांमध्ये स्थलांतरित होणारे नागरिक पाहता ही बाब अतिशय संवेदनशील आहे.
विशेष म्हणजे या मुलाचे नाव जाहीर केले गेले नाही, परंतु तो दक्षिण-पूर्व युक्रेनमधील झापोरिझियाचा आहे, त्याला गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. आजारी नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी त्याच्या पालकांना युक्रेनमध्ये राहावे लागले. हा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर, मुलाने त्याच्या हसतमुख, निर्भयपणा आणि दृढनिश्चयासाठी खूप प्रशंसा मिळवली. स्लोव्हाकियाच्या आंतरिक मंत्रालयाने फेसबुकवर एक टिप्पणी पोस्ट केली असून त्यात मुलाच्या निर्भयता आणि दृढनिश्चयाची प्रशंसा केली. फेसबुक पोस्टने मुलाला काळ- रात्रीचा सर्वात मोठा नायक म्हटले. असे सांगण्यात आले की, मुलाच्या आईने त्याला त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी स्लोव्हाकियाला पाठवले होते. यावेळी त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि फोल्ड केलेल्या चिठ्ठीत संदेश लिहिलेला होता. मुलाच्या आईने त्याची काळजी घेतल्याबद्दल स्लोव्हाक सरकार आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी संदेश पाठवला आहे. आता या घटनेची केवळ युक्रेन आणि आजुबाजुच्या देशांमध्ये नव्हे तर जगभरात चर्चा होत आहे.