इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेनमधील वादाचे आता युद्धात रूपांतर झाले आहे. या दोन देशांव्यतिरिक्त संपूर्ण जगाच्या नजरा युरोप आणि अमेरिकेवर आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. मात्र त्यातील महत्त्वाचे कारण युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये, हे असल्याचे समोर येत आहे. रशियाच्या विघटनानंतर वेगळे झालेल्या देशांपैकी युक्रेनदेखील एक होता. रशियासोबतच त्यावेळी क्रिमिया हा देशदेखील होता, जो २०१४मध्ये रशियाने आपल्या ताब्यात घेतला होता. याशिवाय रशियाचे बहुसंख्य समर्थक युक्रेनच्या डॉनबास, लुहान्स्क आणि डोनेत्स्कमध्ये आहेत. युक्रेनच्या बाहेर बघितले तर बेलारूस, जॉर्जिया पूर्णपणे रशियासोबत आहेत. याचा अर्थ असाही होतो की युक्रेन पूर्णपणे रशियाने वेढलेला आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नाटो संघटनेत युक्रेनचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने चालवलेले प्रयत्न हे आहे. अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या संस्थेमध्ये ३० देशांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश देश हे युरोपमधील आहेत. तर बहुतांश सैनिक हे अमेरिकेतील आहेत. रशियावर दबाव आणि जुन्या वादांमुळे अमेरिका अशा प्रकारची चढाओढ करत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने यापूर्वीही रशियावर निर्बंध लादून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांची ही युक्ती आजवर कामी आली नव्हती. आता युक्रेनला मध्ये घेऊन अमेरिका आपलं उद्दिष्ट साध्य करत असल्याचं दिसत आहे. युक्रेन नाटोसोबत गेल्यास त्याचे सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर अमेरिका रशियाचे नुकसान करण्यात काही प्रमाणात तरी यशस्वी होऊ शकते, अशी चिंता रशियाला आहे.
या हल्ल्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि वेस्टर्न-युरोपियन देशांनी नॉर्ड स्ट्रीम २ पाइपलाइन रोखली आहे. या प्रकल्पावर रशियाने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. याद्वारे रशियाला फ्रान्स, जर्मनीसह संपूर्ण युरोपला गॅस आणि तेलाचा पुरवठा करायचा आहे. यापूर्वी हा पुरवठा ज्या पाइपलाइनमधून होत असे, ती पाईपलाइन युक्रेनमधून जायची. यासाठी रशिया दरवर्षी युक्रेनला लाखो डॉलर्स देत असे. नवीन पाइपलाइन बांधल्यास युक्रेनची कमाई नष्ट होईल.
तिसरे कारण म्हणजे रशियाला युक्रेनने कोणत्याही प्रकारे अमेरिकेसोबत जाऊ नये असे वाटते. याचे एक मोठे कारण म्हणजे रशियाचे युक्रेनशी भावनिक नाते आहे. युक्रेनच्या मातीतूनच रशियाचा पाया रचला गेला. रशियाची ओळख, उरल पर्वतरांगही युक्रेनमधून जाते. अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. शीतयुद्धानंतरही परिस्थिती बदललेली नाही. दुसरीकडे, रशियाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. रशियाला फक्त आपला सन्मान राखायचा आहे आणि युक्रेनने आपली बदनामी करु नये, असे रशियाला वाटते.