इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप सुरूच असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशान्वयेच हे युद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुतिन हे आजारी आहेत. त्यांना कर्करोगाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर तातडीने कर्करोगाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन काही दिवसांसाठी रशियाचा कारभार गुप्तचर संस्था केजीबीच्या माजी प्रमुखांकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय खुद्द पुतिनच घेणार आहेत.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिमलिनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हा दावा केला आहे की, डॉक्टरांनी पुतिन यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेची तारीख अद्याप ठरलेली नसून त्याबाबत चर्चा सुरू आहे. तत्काळ शस्त्रक्रियेची गरज नसून ती पुढे ढकलता येणार नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया होणार होती. ती पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुतिन यांच्याकडे रशियाचे संपूर्ण नियंत्रण आहे. तसेच, त्यांच्याकडे सध्या युक्रेनच्या युद्धाची संपूर्ण जबाबदारी आहे. शस्त्रक्रियेमुळे देशाची कमान कुणाकडे तरी द्यावी लागणार आहे. म्हणून पुतिन यांनी एका व्यक्तीचा विचार केला आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि माजी केजीबी काउंटर इंटेलिजन्सचे अधिकारी निकोलाई पेत्रुशेव्ह यांच्याकडे रशियाचे नेतृत्व सोपविले जाऊ शकते. 70 वर्षीय गुप्तचर अधिकारी निकोलाई हे युक्रेनविरुद्धच्या युद्ध रणनीतीचे सूत्रधार मानले जातात. शिवाय ते पुतिन यांचे विश्वासू आहेत.
विशेष म्हणजे पुतिन यांच्या शस्त्रक्रियेची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा रशिया युक्रेनविरुद्ध युद्धविराम जाहीर करण्याची शक्यता आहे. पुतीन यांनी मोठ्या संख्येने रशियन सैन्याला परतण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, रशियाकडून अद्याप युद्धविरामाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.