इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया व युक्रेनमधील युद्ध सुरू होण्याला ४ महिन्यांचा काळ लोटला असून आता त्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. रशिया युक्रेन युद्धाचे केवळ या दोन देशांवर झाले नसून सर्व जगावर मोठ्या प्रमाणात आता काही दूरगामी परिणाम निदर्शनास येत आहेत. विशेषतः जागतिक बाजारपेठेतील आयात-निर्यात आणि पुरवठा याची गणिते आगामी काळामध्ये बदलण्याची शक्यता दिसते.
ज्याप्रमाणे भारतात पंजाबला गव्हाचे कोठार म्हटले जाते, त्याचप्रमाणे रशियाला जगातील गव्हाचे कोठार म्हटले जाते, परंतु त्यापेक्षाही युक्रेन हा देखील जगातील सर्वाधिक गहू पिकवणारा देश आहे हे अद्यापही जगासमोर आलेले नाही. युक्रेनविरूध्द युद्ध पुकारल्यानंतर, रशियाने बॉम्बफेक आणि इतर मार्गांनी युक्रेनमधून गहू बाहेर येऊ दिला नाही. इतकेच नव्हे तर युक्रेनमधून पाच लाख टन म्हणजे सुमारे 778 कोटी रुपये किमतीचा गहू लुटला, आणि तो ट्रकमधून त्याच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाला पाठवला. तो आता दुष्काळग्रस्त आफ्रिकन देशांमध्ये विकत आहे. मात्र त्याच वेळी दुसरीकडे अमेरिकेने 14 देशांना युद्ध गुन्ह्यांचा फायदा घेण्याविरूद्ध इशारा दिला असून तो गहू खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेने इशाऱ्यासह तीन रशियन मालवाहू विमानांची नावे प्रसिद्ध केली आहेत, परंतु युक्रेन हल्ल्यात शक्तिशाली पाश्चात्य देश आणि रशिया यांच्यात अडकलेले आफ्रिकन देश आधीच योग्य प्रतिकार करू शकणार नाहीत, त्यापैकी बरेच जण रशियन शस्त्रांवर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियावर गहू चोरीचा आरोप पुन्हा सुरू केला आहे. रशिया आणि युक्रेन आफ्रिकेच्या 40 टक्के गव्हाचा पुरवठा करतात. यंदा गव्हाच्या दरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आफ्रिकेतील 17 दशलक्ष लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत.
रशियाने युक्रेनला मदत करणाऱ्या पाश्चिमात्य देशांना इशारा दिल्यानंतर लगेचच कीववरील हल्ले करण्यात आले. रशियन सैन्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधांसह कीववर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. दुसरीकडे, युक्रेनच्या उच्च अधिकार्याने सांगितले आहे की, रशियन सैन्याने आतापर्यंत डोनेस्तक भागातील 43 धार्मिक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. यापैकी बहुतेक इमारती युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या आहेत.
रशियाने युक्रेनसाठी पाश्चात्य सैन्य पुरवठ्याला लक्ष्य करत कीववर हवाई हल्ले सुरू केले. रशियाने कीवमधील ट्रेन रिपेअर यार्डवरही बॉम्बस्फोट केला. या हल्ल्यांमुळे काही इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि पूर्वेकडील दुरुझकिव्का शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. येथे आजूबाजूला भंगार आणि काचेचे तुकडे पाहायला मिळतात.
रशियाच्या अध्यक्षांनी पश्चिम राष्ट्रांना दिलेल्या धमक्यांना न जुमानता ब्रिटनने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली पाठवणार असल्याचे म्हटले आहे. या लढ्यात आम्ही पूर्णपणे युक्रेनसोबत आहोत, असे ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी ठामपणे सांगितले. रशियाच्या बदलत्या रणनीतीमध्ये युक्रेनला आमचा पाठिंबा आहे.