नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रशियन महासंघाच्या फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.
शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकप्रतिनिधींमधील अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीमुळे केवळ मजबूत सहकार्यालाच चालना मिळत नाही तर भागीदारी देखील समकालीन आणि अद्ययावत राहते. नियमित संपर्कांचा सकारात्मक परिणाम व्यापक ‘भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’ मध्ये देखील स्पष्ट दिसून येत असून विविध स्तरांवर सुरु असलेल्या परस्परसंवादामधून भागीदारीला लक्षणीय लाभ मिळत राहील.
नेतृत्व स्तरावर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात नियमित संवाद होतो असे राष्ट्रपतींनी नमूद केले. आपल्या संसदांमधील सहकार्याचा स्तर देखील उत्तम आहे. आंतर-संसदीय आयोग सारख्या यंत्रणांनी सहकार्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे त्या म्हणाल्या. भारत आणि रशियाच्या महिला आणि युवा संसद सदस्यांमध्ये घनिष्ठ संवाद व्हावा याकडे विशेष लक्ष देण्यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्रपतींनी शिष्टमंडळाला सांगितले की नुकतेच त्यांनी नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन केले ज्यामध्ये रशिया फोकस कंट्री आहे. त्या म्हणाल्या की, या प्रदर्शनाने भारतीय वाचकांना रशियाचा समृद्ध साहित्यिक वारसा जाणून घेण्याची एक उत्तम संधी प्रदान केली आहे . सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रात संबंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.