मुंबई – ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी रूपे कार्डमध्ये टोकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत विना पिन आणि विना सीव्हीसी ग्राहकांना लाखो रुपयांचे व्यवहार करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे (एनपीसीआय) रूपे कार्ड टोकन प्रणाली सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
एनपीसीआय टोकनायझेशन सिस्टिम (एनटीएस) च्या अंतर्गत दुकानदार कार्डची माहिती आपल्याजवळ सुरक्षित ठेवू शकणार आहेत. हा पर्यायी वापर असेल. या प्रणालीमुळे ग्राहकांच्या कार्डचे संरक्षण होईलच, शिवाय खरेदीसुद्धा सोपी ठरणार आहे. एनपीसीआयने सांगितले, की या प्रणालीत आरबीआयच्या दिशानिर्देशांनुसार सुरक्षित व्यवहारात मदत करण्यासाठी ग्राहकांच्या संवेदनशील माहितीला विशेष कोड (टोकन) मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. ग्राहकांना आता कोणत्याही थर्ड पार्टी अॅप किंवा पॉइंट ऑफ सेल (पीओएस) वर टोकनचा वापर करून पेमेंट करता येणार आहे.
टोकन जनरेट करण्यासाठी कार्ड देणार्या कंपन्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कार्डची संपूर्ण माहिती, टोकनसाठी अर्ज करणार्या कंपनीची माहिती (ज्या कंपनीला पेमेंट करण्यासाठी टोकन जनरेट करायचा आहे) आणि ग्राहकांच्या मोबाइल किंवा टॅबची माहिती भरावी लागेल. त्यानुसार टोकन जनरेट होईल. ज्या कंपनीला पेमेंट करण्यासाठी टोकन बनवले आहे, तिला हे टोकन शेअर करायचे आहे.
ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. सुविधेचा वापर करण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नाही. तसेच बँक किंवा कार्ड देणार्या कंपन्यांना ते लागूही करता येणार नाही. विशेष म्हणजे ग्राहकांना संपर्करहित, क्यूआर कोड किंवा इन अॅपच्या खरेदीसारख्या कोणत्याही सेवेच्या नोंदणीसाठी त्यातून बाहेर पडण्याचा (डी रजिस्टर) अधिकार असेल. टोकन प्रणालीवर कार्ड पेमेंटच्या माध्यमातून होणार्या व्यवहारासाठी ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासह दररोजच्या व्यवहाराची मर्यादा ठरवता येणार आहे. त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या व्यवहाराव्यतिरिक्त अधिक व्यवहार करता येणार नाहीत.