इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकीय नेत्यांची मुलं अभिनय क्षेत्रात येणं ही गोष्ट काही नवीन नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मनोरंजन विश्वात प्रवेश करतो आहे. रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर ‘विरजण’ या आगामी मराठी सिनेमात दिसणार आहे. स्वतः रुपाली चाकणकर यांनीच सोशल मीडियावरून ही बातमी दिली आहे. सोहम चाकणकर याची मुख्य भूमिका असलेला ‘विरजण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मातृदिनी एक गाणे
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘विरजण’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमात सोहम रोमँटिक भूमिका साकारताना दिसेल. सोहमच्या या सिनेमाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि आता या सिनेमातील गाणेही समोर आले आहे. ‘देवा सांग ना’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात प्रेमातील विरह दाखवण्यात आला आहे. मराठीतील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चाकणकरांनी स्वतः पोस्ट करत दिली माहिती
स्वतः रुपाली चाकणकर यांनीदेखील ही माहिती दिली आहे. रुपाली लिहितात, ”आज सोहमच्या ‘विरजण’ या चित्रपटातील ‘देवा सांग ना” हे गाणे प्रदर्शित झाले.” यापूर्वी ‘विरजण’ सिनेमाचे पोस्टर आणि ‘माझी आई तू’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. चाकणकरांनी केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले असून, सोहमला या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Rupali Chakankar Son Soham Cinema Entry