इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्राजंल खेवलकर विरुध्द महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर आता पोलिस महासंचालकांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी असे सांगितले आहे.
पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी असे पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रूपाली चाकणकर यांनी नमूद केले.
महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी. तपासाअंती दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल असे कळविण्यात आले आहे.
रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव, इतर कोणतेही माध्यम महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी. सदर प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी हि संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते असेही म्हटले आहे.

