वाराणसी (उत्तर प्रदेश) – भारत आणि जपानमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या भव्य रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (१५ जुलै) लोकार्पण करण्यात आले. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारत दौर्यावर असताना गंगेची आरती केली होती. त्यादरम्यान त्यांनी शपथ घेऊन आपल्या भक्कम संबंधांबाबत सुवर्ण अक्षरात लिहिले होते. रुद्राक्षच्या निमित्ताने वाराणसी आणि जपानच्या कला, संस्कृतीचे प्रतीक म्हणून जगासमोर नवे आयाम लिहिले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौर्यावर असून त्यांनी दुपारी रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरचे लोकार्पण केले. या वेळी जपानचे राजदूत सतोषी सुझुकी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
१८६ कोटी रुपयांच्या निधीतून रुद्राक्ष शिवलिंगाच्या आकारात तयार करण्यात आले आहे. जपानी आणि भारतीय स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरचा आराखडा जपानच्या ओरिएंटल कन्सल्टंट ग्लोबल या कंपनीने तयार केला आहे. जपानी फुजिता कॉर्पोरेशन या कंपनीने बांधकाम केले आहे. रुद्गाक्ष सेंटरमध्ये मोठे म्युझिक कॉन्सर्ट, नाटक, प्रदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.
रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरची वैशिष्ट्ये
– वातानुकूलित सेंटरमध्ये १२०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था, दोन भागात विभागण्याची सुविधा
– मोठ्या सभागृहाशिवाय १५० लोकांच्या क्षमतेचे एक बैठकीचे सभागृह असेल. एक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी कक्ष, चार ग्रीन खोल्या.
– दिव्यांगांच्या सुविधेसाठी संपूर्ण परिसर फ्रेंडली.
– सेंटरच्या बाहेरील भागात अॅल्युमिनिअमचे १०८ सांकेतिक रुद्राक्ष लावण्यात आले आहे.
– तीन एकच्या परिसरात जपानी शैलीची बाग आणि लँडस्केपिंग.
– तळघरात १२० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही.
– वीजपुरवठ्यासाठी वीज कनेक्शनसह सौरऊर्जेचाही जोड देण्यात आला आहे.
– १० जुलै २०१८ काम सुरू झाले. मार्च २०२१ मध्ये सेंटरचे काम पूर्ण झाले.
– रुद्राक्ष सेंटरचे छत शिवलिंगाच्या आकारात दिसते.
– रुद्राक्षांमध्ये जपानी फुलांचा सुगंध दरवळणार.
– जपानी छत, बांबू आणि सजावटीच्या वस्तूंनी हा संपूर्ण परिसरत सजवण्यात आला.
– प्रिमुला, बाना, इकेबाना, ब्लूबेल, कॅमलिया, कारनेटरसन या जपानी फुलांचा वापर.
– रजनीगंधा, झेंडू, गुलाब, बेला आणि इतर सजावटीच्या भारतीय फुलांचा वापर