विशेष प्रतिनिधी, नाशिक
महाविकास आघाडी सरकारवर आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. पोलिस दलाला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता परिवहन विभागातील मोठा घोटाळा पुढे आला आहे. परिवहन विभागात बदल्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या लाचेचा घोटाळा तब्बल ३०० कोटी रुपयांचा असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यात ३०० कोटींचा हा ट्रान्सफर पोस्टींग घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. या प्रकरणात गजेंद्र पाटील यांना चौकशीसाठी २७ मे रोजी बोलावले होते. पण, ते हजर झाले नाहीत. आता ते ३१ मे नंतर हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर आता महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब व सहा वरीष्ठ यांच्या विरोधात ही तक्रार आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात पोलीसांच्या चौकशीनंतर यात किती सत्य व पुरावे आहे हे समोर येईल. ही तक्रार पाटील यांनी १६ मे रोजी ई – मेलवरुन केली होती. त्यानंतर त्यांनी समक्ष हीच तक्रार १७ मे रोजी केली आहे.
दरम्यान, पाटील यांनी तक्रार केलेल्या सहा अधिका-यांची पोलिस चौकशी करीत आहेत. या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. परिवहन खात्यातील गैरव्यवहार नवा नाही. या विरोधात अगोदरही अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण, एका निलंबीत अधिका-यांनेच ही तक्रार केल्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढले आहे.
पाटील यांच्या निलंबनाची चर्चा
नाशिक येथे आरटीओत गजेंद्र पाटील हे मोटार वाहन निरीक्षक असून ते सध्या निलंबित आहेत. धुळे येथे काम करत असतांना त्यांनी तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिका-याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाच घेतांना या अधिका-याला अटक झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांचे निलंबन नेमके कशामुळे झाले याची चर्चा सध्या रंगत आहे.