नाशिक (वृत्तसेवा) – प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या १४ वाहनांचा २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी केले आहे.
जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे २० हजार रूपये रक्कमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) व एक हजार रूपये लिलाव शुल्कासह नाव नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, पेठ रोड, नाशिक येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.
वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती १५ फेब्रुवारी पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.