नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना देण्यात आलेल्या भाडेवाढीस अनुसरून ऑटोरिक्षा मीटरचे पुन:प्रमाणिकरण ३१ जानेवारी २०२३ पर्यंत करणे आवश्यक होते. परंतू बहुतांश ऑटोरिक्षांच्या मीटरचे पुन:प्रमाणिकरण झाले नसल्याने ऑटोरिक्षा मीटर पुन:प्रमाणिकरणास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी कळविले आहे.
वर नमूद मुदतवाढ दिलेल्या कालावधीत ऑटोरिक्षा मीटरचे पुन:प्रमाणिकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन करण्यात येईल. परवाना निलंबन कालावधी किमान सात दिवस व कमाल ४० दिवसांचा राहिल. त्याचप्रमाणे परवाना निलंबना ऐवजी तडजोड शुल्क मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी रुपये 50 आकारण्यात येईल. तडजोड शुल्क किमान रूपये ५०० व कमाल रूपये दोन हजार पेक्षा अधिक असणार नाही, असेही प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.
ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ऑटोरिक्षा मीटर नविन दराप्रमाणे सुधारित करून घेण्यात यावे. तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ मे २०२३ पासून राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.