नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समलैंगिकतेला मान्यता असावी की असू नये या मुद्यावर प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत असू शकते. अर्थातच बऱ्याच विचारधारांमध्ये त्याला मान्यता नाही, पण त्या त्या विचारधारेच्या काही लोकांचे व्यक्तिगत मत त्याला मान्यता देते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत असेच काहीसे घडताना दिसत आहे. समलैंगिकतेबाबत संघातच भिन्न मते असल्याचे निदर्शनास येत आहे.
काही महिन्यांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समलैंगिकता ही भारतीय संस्कृतिचा भाग असल्याचे विधान केले होते. पण आता संघाचेच एक मोठे नेते समलैंगिकता ही राक्षसी प्रथा असल्याचे म्हटले आहे. अर्थात भागवतांनी एखादे विधान करणे म्हणजे संघाची भूमिका मांडण्यासारखे आहे. त्यामुळे संघाच्या एका दुसऱ्या नेत्याने विपरित विधान करणे आश्चर्याचे मानले जात आहे.
भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सी. के. नारायणन यांनी ‘द ऑर्गनायझर’ या साप्ताहिकात एक लेख लिहीला आहे. यामध्ये त्यांनी धर्मशास्त्रानुसार समलैंगिक संबंध गुन्हा असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भागवतांनी शास्त्राचाच दाखला देऊन समलैंगिक संबंध संस्कृतिचा भाग असल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांसारख्या अनैसर्गिक कृत्याला फौजदारी गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते.
सी. के. नारायणन यांनी त्या आदेशांवरही टिका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच यूएपीए कायद्यावरून घेतलेल्या भूमिकेवरही नारायणन यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतीय न्यायव्यवस्था अमेरिकेच्या संविधानातील तत्त्व आंधळेपणाने अंमलात आणत असल्याबाबत नारायणन यांनी या लेखातून चिंता व्यक्त केली. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देणे आणि व्यभिचार आणि समलैंगिकतेला फौजदारी गुन्ह्यांच्या प्रक्रियेतून बाहेर काढणे, हे निर्णय अमेरिका आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या तत्त्वांना साजेसे आहेत. संवैधानिक मूल्यांचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय घेतले असल्याचे ते म्हणतात.
रामायण काय म्हणतं?
नारायणन यांनी समलैंगिक संबंधांचा उल्लेख रामायणात आला आहे, असे लेखात म्हटले आहे. हनुमानाने लंकेत असताना राक्षस महिलांमध्ये ही प्रथा पाहिल्याचा उल्लेख रामायणात असल्याचेही नारायणन म्हणतात. धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्राने समलैंगिकतेला अपराध मानले होते. तसेच कामासूत्रातही समलैंगिकतेला अनैसर्गिक आणि व्यभिचारी असल्याचे म्हटले आहे. समलैंगिकता अस्तित्वात असली तरी त्याला कधीही समाजमान्यता नव्हती, अशी भूमिका नारायणन यांनी लेखात मांडली.
हंस आणि दिंभकाचे उदाहरण
डॉ. मोहन भागवत यांनी यावर्षी जानेवारीमध्ये ‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ या साप्ताहिकांना मुलाखत देऊन एलजीबीटीक्यू समुदायाच्या विषयाला हात घातला होता. या समुदायाला भारतीय संस्कृतीने पुराणकाळापासून सामावून घेतले असल्याबाबतचा दाखला त्यांनी दिला होता. यासाठी जरासंध राजाच्या हंस आणि दिंभक या दोन सेनापतींचे उदाहरण त्यांनी दिले होते. या दोघांमध्येही समलैंगिक संबंध असल्याचे भागवत यांनी त्या वेळी सांगितले होते.
RSS Sarsanghachalak Mohan Bhagwat on Gay Sex