इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकांच्या मनातून जातींविषयीचा भेदभाव नाहीसा होईपर्यंत आरक्षण टिकायला हवे. गेल्या दोन हजार वर्षांपासून त्यांनी त्रास सहन केला असेल, तर पुढील दोनशे वर्षे सवर्ण आरक्षण का सहन करू शकत नाहीत, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालन्यात मराठा आरक्षणावरून रण पेटलेले आहे. राज्य सरकारच्या कुठल्याही तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवायला आंदोलक तयार नाहीत. अशात सरसंघचालकांनी आरक्षणाला पाठींबा दर्शविला आहे. आरक्षणावर बोलताना डॉ. भागवत म्हणाले,‘आपल्या देशात दिलेल्या आरक्षणाला सामाजिक विषमतेचा इतिहास आहे. आपण आपल्याच समाजातील बांधवांना समाजव्यवस्थेत मागे ठेवले आणि त्यांचे जीवन पशूंसारखे झाले. त्यांची काळजी घेतली नाही. परिस्थिती बिकट झाली तरी चिंता केली नाही. कुटुंबात आजारी व्यक्तीची आपण विशेष काळजी घेतो. तसेच मागे राहिलेल्या बांधवांना बरोबरीने आणण्याच्या दिशेने उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळेच आरक्षण लागू केले गेले. भेदभाव संपत नाही, तोपर्यंत संविधानुसार आहे तेवढे आरक्षण सुरूच राहावे.’
याच कार्यक्रमात एका प्रश्नाच्या उत्तरात सरसंघचालकांनी अखंड भारताच्या मुद्यावर भाष्य केले. ‘अखंड भारत म्हणजे सीमा बदलणे नव्हे, तर भारतीय मानसिकता स्वीकारणे होय. देशाची फाळणी झाली, कारण त्यांची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी होती. भारताचे सध्याचे चित्र पाहून शेजारील अनेकांना आता तसे वाटत आहे. त्यांनी एकदा का आमची विचारसरणी स्वीकारली, की ज्यात कट्टरतेचा समावेश नसेल, त्यावेळी अखंड भारताची निर्मिती होईल. आताची पिढी वृद्ध होण्याआधीच हे स्वप्न पूर्ण होईल.’
सरसंघचालक झाले संवादी
अग्रवाल समाजाच्या संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या अग्रसेन छात्रावास या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात बुधवारी डॉ. भागवत बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सरसंघचालकांकडून श्रोत्यांमधून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. अलीकडच्या काळात सरसंघचालक ‘संवादी’ झाले असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
RSS Chief Mohan Bhagwat on Reservation
Rashitriy Swayamsevak Sangh