गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच असून, हिंदू-मुस्लिम एक आहेत. पूजनाच्या पद्धतींमुळे आम्हाला वेगळे केले जाऊ शकत नाही. भाषा, प्रांत आणि इतर विषमतांना वगळून आपण एक व्हावे आणि भारताला जगतगुरू करावे. भारत जगतगुरू झाल्यावरच जग सुरक्षित राहणार आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
गाझियाबादच्या वसुंधरा येथील मेवाड महाविद्यालयात ते बोलत होते. डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या “वैचारिक समन्वय-एक पहल” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मोहन भागवत आले होते. डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद हे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार होते.
राजकारणामुळे निर्माण झालेली फुटीरतावादी वृत्ती हटविण्याची गरज आहे. गाय ही गोमाता असून पूजनीय आहे. भारत हिंदू राष्ट्र आहे. परंतु मॉब लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत. आम्ही त्यांना कधीच पाठिंबा दिला नाही. दुसर्यांना मारहाण करणारे हिंदुत्वाविरुद्ध जात आहेत. पक्षपात न करता अशा लोकांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले.
भागवत म्हणाले, या पुस्तकाचे प्रकाशन व्होटबँकसाठी केल्याचे कोणीही समजू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त राष्ट्रवादासाठी काम करतो. राजकारण करणे स्वयंसेवकांचे काम नाही. संघ जोडायचे काम करतो, तर राजकारण तोडण्याचे शस्त्र असते. राजकारणामुळेच हिंदू-मुस्लिम एक होऊ शकले नाहीत. संघ निवडणुकीमध्ये आपली पूर्ण ताकद लावतो. परंतु जे काही करतो ते राष्ट्रहितासाठीच करतो. या पुस्तकातील मजकूर पाहिल्याशिवाय मी प्रकाशनाला होकार दर्शविला, कारण यामध्ये प्रामाणिकतेचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद म्हणाले, हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. मुस्लिम समाजाने डोळ्यावरील पट्टी हटवून सर्वांना सोबत घ्यावे. कट्टरता सोडून बंधूभावाच्या मार्गावर चालावे. या वेळी सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाळ, सहसंपर्कप्रमुख रामलाल आणि मुस्लिम मंचाचे मार्गदर्श इंद्रेश कुमार उपस्थित होते.