नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. काही हिंदू संघटनांचा उल्लेख करत मोहन भागवत यांनी प्रत्येक दुसऱ्या दिवशी मंदिर-मशीद मुद्दा उकरून काढून त्यावर वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यांवर सौहार्दपूर्ण उपाय काढणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्रित बसून शांततेने एकमेकांशी संवाद साधायला हवा, असेही ते म्हणाले. आवश्यक असल्यास न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता एकही मंदिर आंदोलन करणार नाही, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.
नागूपरमध्ये आरएसएस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
दररोज उठून मंदिर-मशीद वादावर द्वेष पसरवणे आणि वाद उत्पन्न करणे चुकीचे आहे. त्यापेक्षा मुस्लिम बांधवांसोबत एकत्रित बसून या मुद्द्यांवर तोडगा काढायला हवा, असे त्यांनी सांगितले.
हिंदू असो किंवा मुस्लिम असो, या ऐतिहासिक सत्य आणि तथ्यांचा स्वीकार करावा, असे म्हणत त्यांनी काशी-ज्ञानवापी मशिदीचा उल्लेख न करता ज्ञानवापी मशिदीत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचा आदर ठेवावा असे अप्रत्यक्षरित्या सांगितले. मथुरा येथील ईदगाह मशीद हटविण्यासह शाही ईदगाहमध्ये कृष्ण मूर्ती स्थापित करण्याची मागणीही त्यांनी केली. काही हिंदूत्ववादी संघटनांनी या आंदोलनात आरएसएसला जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरएसएस आता अशा कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राचीन भारतात मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि एका वेगळ्या धार्मिक पद्धतीचे पालन करत होते. हिंदूंनी अखंड भारताचे विभाजन स्वीकारले होते आणि एक मुस्लिम देश पाकिस्तानचा मार्ग प्रशस्त केला होता. याचाच अर्थ भारतात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहिले त्यांनी पाकिस्तानची निवड केली नाही. ते आमचे भाऊ आहेत, असेही भागवत म्हणाले.