मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकांवर कारवाई झाली की त्या बँकांमधल्या खातेधारकांसाठी ती चिंतेची बाब होते. आता रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातल्या आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरमधील शंकरराव पूजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड असे या बँकेचे नाव असून त्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सहकारी बँकांवर कारवाई होण्याची प्रकरणे गेल्या काही काळात अनेकदा समोर आली आहेत. आता रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार कोल्हापूरमधील शंकरराव पूजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड या बँकेवर कारवाई करण्यात आली असून ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली असून तणाव निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही बँक आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे यामुळे उघड झाले आहे.
या बँकेतील ९९.८८ टक्के खातेधारक हे DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेतंर्गत येतात. या योजनेनुसार, खातेदारांना ५ लाख रुपयांच्या विम्याचे कवच मिळत असते. पण १३ मे २०२२पासून बँकेवर निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, बँकेच्या कामकाजाच्या पद्धतींवरही रिझर्व्ह बँकेची बारीक नजर असणार आहे. बँकेत लिक्विडीटी ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे आता बँकेतून पैसे काढण्यावर ग्राहकांना मनाई करण्यात आली आहे असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
बँक बंद होणार की काय या विचाराने खातेधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पण ही कारवाई बँक बंद करण्यासाठी केलेली नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बँक सुरुच राहणार आहे. परंतु, कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मात्र बँकेला घ्यावी लागेल.
डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विम्यानुसार बँक जमा असलेल्या रकमेवर ग्राहकांना विमा सुरक्षा देते. हे विमा संरक्षण जास्तीतजास्त ५ लाख रुपयांपर्यंत असते. या विम्यामुळे बँक बुडाली तरी ग्राहकांना कमाल ५ लाख रुपये मिळू शकणार आहेत